रणजित मस्के, प्रतिनिधी
पुणे नारायणगाव बस स्थानक परिसरात एसटी बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांची गर्दी पाहत त्यांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका अत्यंत सराईत आणि अट्टल गुन्हेगाराला जेरबंद करण्यात पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांना मोठे यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून तब्बल १८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. अर्जुन कानिफनाथ भोसले (वय २७, राहणार धनगर वस्ती, अहिल्यादेवी नगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर) असे या अटक केलेल्या अट्टल चोरट्याचे नाव असून, त्याच्यावर यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांमध्ये ४० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.
गर्दीचा फायदा घेऊन दागिने लांबवले
मिळालेल्या माहितीनुसार, २८ एप्रिल २०२६ रोजी फिर्यादी मीरा गणपत शिंदे (वय ४८, राहणार बोरी साळवाडी, तालुका जुन्नर) या नारायणगाव बस स्थानकावरून साळवाडी येथे जाण्यासाठी एसटी बसमध्ये चढत असताना, गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोराने त्यांच्या पर्समधील २० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरले होते. तसेच, त्याच ठिकाणी भागवत निवृत्ती घाडगे (वय ७५) यांचीही दीड तोळ्याची सोन्याची चैन चोरीला गेली होती. याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्ही आणि खबऱ्यांच्या जाळ्यामुळे आवळल्या मुसक्या
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बस स्थानक आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. यादरम्यान एक संशयित इसम पोलिसांच्या रडारवर आला. गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती काढली असता, हा संशयित रेकॉर्डवरील अट्टल चोरटा अर्जुन भोसले असल्याचे निष्पन्न झाले.
६ जून २०२६ रोजी हा आरोपी नाशिक फाटा, भोसरी येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे त्या ठिकाणी सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून १८ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे.
या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी केली कामगिरी
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिप गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक शर्मा, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली.
कारवाईत सहभागी असलेले अधिकारी व कर्मचारी
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण सपांगे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर शेटे, पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिपक साबळे, पोलीस हवादार राजू मोमिन, पोलीस हवादार संदीप वारे, पोलीस शिपाई अक्षय नवले, पोलीस शिपाई अभिमन्यू मोटे, महिला पोलीस हवादार नंदा कदम, महिला पोलीस हवादार सुजाता कदम, पोलीस हवादार संतोष भापकर, पोलीस शिपाई भारत मोहोळ, पोलीस हवादार मंगेश लोखंडे, पोलीस शिपाई सत्यम केळकर, पोलीस शिपाई सोमनाथ डोके, महिला पोलीस हवादार सुवर्णा गडगे, महिला पोलीस शिपाई कविता गेंगजे आणि पोलीस शिपाई टीलेश जाधव या सर्वांनी मिळून ही यशस्वी कामगिरी बजावली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास नारायणगाव पोलीस करत आहेत.


