रणजित मस्के, प्रतिनिधी
बीड : जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बीड पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई करत धोकादायक गुंडाला एमपीडीए (MPDA) कायद्याअंतर्गत हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या नेतृत्वाखाली गुन्हेगारी, गुंडगिरी आणि अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेचा हा भाग आहे.
पोलीस ठाणे पेठ बीड यांनी शेख कलीम शेख जमाल (वय ४१, रा. बारादरी मशीदजवळ, इस्लामपुरा, पेठ बीड) याच्याविरोधात एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आदेश जारी करून संबंधित इसमास हर्सूल कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबद्ध करण्याचे निर्देश दिले.
सदर आरोपीविरुद्ध शिवाजीनगर, बीड शहर आणि पेठ बीड पोलीस ठाण्यात शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, धमक्या देणे, जबरी चोरीचा प्रयत्न, लोकसेवकांच्या कामात अडथळा निर्माण करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, मारहाण करणे आणि दहशतीचे वातावरण निर्माण करणे अशा गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नव्हता. २०२३ पासून तो सातत्याने गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असल्याने परिसरात नागरिक आणि शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर न्यायालयाची परवानगी घेऊन संबंधित आरोपीला कायदेशीर ताब्यात घेण्यात आले आणि कडक पोलीस बंदोबस्तात हर्सूल कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे रवाना करण्यात आले.
या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अभिमन्यू औताडे, तत्कालीन पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, प्रभारी पोलीस निरीक्षक निलेश केळे, पोलीस उपनिरीक्षक मन्सूर शहा, पोलीस हवालदार सुभाष मोठे, पोलीस हवालदार नितीन राठोड, पोलीस हवालदार नितेश माने आणि पोलीस अंमलदार गिरी यांनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान, भविष्यात वाळूचा चोरटा व्यापार करणारे, अवैध गुटखा विक्री करणारे, जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे, जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण करणारे समाजकंटक, तसेच दादागिरी व खंडणीखोरी करणाऱ्या धोकादायक गुंडांविरोधात एमपीडीए कायद्यांतर्गत कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिले आहेत.


