स्वप्नील गाडे,प्रतिनिधी
मुंबई : बांद्रा पूर्व परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ऑटोरिक्षा चोरीच्या मालिकेचा खेरवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल १२ चोरीच्या ऑटोरिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत सुमारे ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
१५ जून रोजी कार्डिनल स्कूलसमोरील रस्त्याच्या बाजूला उभी असलेली एमएच ०२ ईएफ ३२११ क्रमांकाची ऑटोरिक्षा चोरीला गेल्याची तक्रार खेरवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता दोन संशयित इसमांची हालचाल आढळून आली.
तपासादरम्यान मोहम्मद इक्बाल सिरताजअली शेख उर्फ लकी (वय २३) आणि मोहम्मद फरीद मिराजअली हाशमी (वय २०) हे दोघे चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याचे समोर आले. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून त्यांना वाकोला पाइपलाइन परिसरातून ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपींनी खेरवाडी, निर्मलनगर, वाकोला आणि विलेपार्ले पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ऑटोरिक्षा चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी चोरीच्या ऑटोरिक्षांचा वापर करून बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणांवरून भंगार चोरी करत असल्याचेही उघड झाले. काम पूर्ण झाल्यानंतर ते ऑटोरिक्षा निर्जनस्थळी लपवून ठेवत होते.
दरम्यान, मुख्य आरोपी मोहम्मद इक्बाल शेख याच्यावर यापूर्वीही दरोडा, चोरी आणि इतर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
या कारवाईत खेरवाडी, निर्मलनगर, विलेपार्ले आणि वाकोला पोलीस ठाण्यांतील एकूण १२ ऑटोरिक्षा चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उप आयुक्त नितीन गोयल, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुप्रिया पाटील आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुणाल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप लोंढे, पोलीस हवालदार तातोबा मोरे, पोलीस हवालदार गणेश सावंत, पोलीस हवालदार गणेश ठोंबरे, पोलीस हवालदार श्याम ठाकरे, पोलीस शिपाई समीर कांबळे आणि पोलीस शिपाई महेश पाटील यांचा समावेश होता.


