कल्याण प्रतिनिधी
कल्याण : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे शुक्रवारी कल्याणमध्ये मॉर्निंग वॉक रॅली काढण्यात आली. या रॅलीत विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात २०१३ मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेला १३ वर्षे पूर्ण झाली असून, तरीही हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीपर्यंत तपास यंत्रणेला पोहोचता आलेले नाही, असा आरोप रॅलीच्या आयोजकांनी केला. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयीन प्रक्रियेनंतर दिलासा मिळाल्याने तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही आयोजकांनी प्रश्न उपस्थित केले.
दाभोळकर यांच्या हत्येनंतर कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांचीही हत्या झाली. या विचारवंतांच्या हत्यांचा छडा लावण्यात तपास यंत्रणांना अपयश आले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दाभोळकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला पकडून त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी रॅलीत करण्यात आली.
कल्याणमधील शिवाजी चौक येथून रॅलीला सुरुवात झाली. महम्मद अली चौक, कल्याण रेल्वे स्थानक मार्गे ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे पोहोचली. तेथे रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी ‘डॉ. नरेंद्र दाभोळकर अमर रहे’, ‘कॉम्रेड पानसरे अमर रहे’, ‘कलबुर्गी, गौरी लंकेश अमर रहे’ अशा घोषणा देण्यात आल्या.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याध्यक्ष सुषमा बसवंत यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली. शिक्षक संघटनेचे अशोक बहिरव, बाबा रामटेके, कॉम्रेड उदय चौधरी, सेवा दलाचे सुहास कोते, मिलिंद गायकवाड, शैलेश दोंदे, कुणबी संघटनेचे सुरेश कापरे, अॅड. उदय रसाळ, विशाल जाधव, दिलीप वाळंज, सदाशिव पाचपोर, जोशी, सुनील पगारे, विजय थोरात, सारंग बगाडे, भगवान नरवडे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक रॅलीत सहभागी झाले होते.

