कल्याण प्रतिनिधी
कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने डोंबिवली पूर्वेतील जोंधळे विद्यालयात रविवारी ‘खासदार आपल्या भेटीला-जनता दरबार’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून वैयक्तिक, सामाजिक तसेच शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या विविध समस्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासमोर मांडल्या.
नागरिकांनी मांडलेल्या बहुतांश तक्रारींवर उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांकडून जागेवरच कार्यवाही करण्यात आली. तसेच प्रलंबित कामे प्राधान्याने आणि तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले. विविध नागरिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही आपल्या मागण्यांची निवेदने खासदारांकडे सादर केली. या निवेदनांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
“नागरिकांच्या समस्या केवळ ऐकून घेणे नव्हे, तर त्यावर तातडीने कार्यवाही करून त्या सोडविणे ही जनप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी आहे. याच उद्देशाने कल्याण लोकसभा मतदारसंघात ‘खासदार आपल्या भेटीला’ हा उपक्रम नियमितपणे राबविण्यात येतो,” असे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले.
या जनता दरबाराला आमदार राजेश मोरे, महापौर हर्षाली चौधरी, जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक, केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

