रणजित मस्के, प्रतिनिधी
अहिल्यानगर: जिल्ह्यात प्रतिबंधित आणि आरोग्यास घातक ठरणारा गुटखा व सुगंधीत तंबाखू विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेने हाती घेतले आहे. घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या एका धडक कारवाईत पोलिसांनी ५५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील गुटखा माफियांचे जाळे उद्ध्वस्त करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, रणखांब (ता. संगमनेर) येथील एका घरात प्रभाकर आण्णासाहेब गुळवे याने बेकायदेशीरपणे गुटख्याचा साठा करून ठेवला आहे. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून घराची झडती घेतली असता, तेथे मोठ्या प्रमाणात गुटखा व तंबाखू मिळून आली.
कोणाची होती साखळी?
पोलिसांच्या चौकशीत आरोपी प्रभाकर गुळवे याने सांगितले की, हा साठा राजु नामदेव ढेरंगे (रा. खंडेरायवाडी) याच्या सांगण्यावरून ठेवला होता, तर हा प्रतिबंधित माल आफ्रिदी पठाण (रा. संगमनेर) याच्याकडून आणला होता. या तिघांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईतील पथक
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, पोलीस हवालदार राहुल डोके, पोलीस हवालदार बाळासाहेब गुंजाळ आणि पोलीस हवालदार योगेश कर्डीले यांच्या पथकाने केली आहे. सध्या घारगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


