वसई प्रतिनिधी
वसई : चारित्र्याच्या संशयातून पत्नीला बेदम मारहाण करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी पेल्हार पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहफूज शेर अली शेख (वय ३०) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार ९ जून रोजी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास कलाम खान (वय ४०) याने पत्नी नसीबुन्नीसा हिच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी वाद घातला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. आरोपीने पत्नीला हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी पट्टीने मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
मारहाणीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नसीबुन्नीसा बाथरूमला जाऊन परत आली व झोपली. काही वेळानंतर तिच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नसल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. तिला तपासले असता तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
घटनेची माहिती मिळताच पेल्हार पोलिसांनी तपास सुरू केला. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी कलाम खान याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. १२ जून रोजी गुन्हा नोंदविल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास पेल्हार पोलीस करीत आहेत.


