वसई प्रतिनिधी
वसई : फुटबॉलमध्ये करिअर घडवण्याचे स्वप्न दाखवून एका १७ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार वसईतून समोर आला आहे. अभिजित मेंडल (वय ३६) असे अटक करण्यात आलेल्या नराधम फुटबॉल प्रशिक्षकाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण वसई परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
पीडित मुलगी फुटबॉल प्रशिक्षणासाठी २०२३ मध्ये अभिजित मेंडलच्या प्रशिक्षण केंद्रात दाखल झाली होती. प्रशिक्षकाने तिला फुटबॉल क्षेत्रात मोठी संधी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने तिचे वेळोवेळी लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली. तीन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत त्याने अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची गंभीर तक्रार माणिकपूर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.
या नराधमाने केवळ अल्पवयीन मुलीवर अत्याचारच केले नाहीत, तर त्या कृत्याचे व्हिडिओ आणि फोटो काढून तिला ब्लॅकमेलही केले. पीडित मुलीने काही काळाने प्रशिक्षकापासून अंतर राखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला पुन्हा आपल्या जाळ्यात ओढले. या धमक्यांमुळे पीडित मुलगी मानसिक तणावाखाली वावरत होती. अखेर तिने धैर्याने सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांच्या कानावर घातला.
कुटुंबीयांच्या मदतीने पीडित मुलीने माणिकपूर पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. पोलिसांनी अभिजित मेंडलवर बलात्कार, धमकावणे आणि पोक्सो कायद्याच्या विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून, त्याने अन्य कोणाचे शोषण केले आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे क्रीडा प्रशिक्षकाच्या नात्यातील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पालकांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाकडून या प्रकरणात जलदगतीने खटला चालवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.


