पालघर, प्रतिनिधी
पालघर शहरात शुक्रवारी संध्याकाळी एका महिला शासकीय कर्मचाऱ्यावर भररस्त्यात धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या २८ वर्षीय स्नेहल सावंत यांच्यावर एका तरुणाने पाठीमागून धावत येत कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर अमोल मुळे हा न्यायालयात शिपाई म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली असून घटनेनंतर तो फरार झाला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
Horrific attack on woman employee in Palghar.
A peon from the Collector’s office grabbed a female colleague by the neck on a public road and repeatedly attacked her with a sharp weapon. The brutal video is now viral.
This is not just an individual crime, it reflects complete… pic.twitter.com/EeYc9Np6la
— GarudEyeIntel | OSINT 🇮🇳 (@GarudEyeIntel) June 13, 2026
कार्यालयातून घरी परतताना हल्ला
स्नेहल सावंत या मूळच्या सातारा जिल्ह्यातील दहीवडी येथील रहिवासी असून सध्या पालघर येथे वास्तव्यास आहेत. त्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास त्या कार्यालयातील कामकाज आटोपून पायी घरी जात होत्या. पालघर शहरातील गोल्ड सिनेमा परिसरातील रस्त्यावर त्या पोहोचताच आरोपी अमोल मुळे याने त्यांच्यावर हल्ला चढविल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, आरोपी काही काळापासून परिसरात दबा धरून बसला होता. स्नेहल सावंत या एकट्याने रस्त्याने जात असताना त्याने बॅगेतून धारदार कोयता काढून त्यांच्या दिशेने धाव घेतली आणि मागून हल्ला केला.
मान, पाठ आणि खांद्यावर सपासप वार
हल्ल्याची तीव्रता इतकी भीषण होती की, स्नेहल सावंत यांना स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही. आरोपीने त्यांच्या मानेवर, पाठीवर, खांद्यावर आणि कंबरेवर एकामागून एक अनेक वार केले. गंभीर जखमी झालेल्या सावंत या रस्त्यावर कोसळल्या. मात्र, त्या खाली पडल्यानंतरही आरोपीने त्यांच्यावर वार सुरूच ठेवल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी आरडाओरड सुरू केल्यानंतर आणि लोक मोठ्या संख्येने जमा होऊ लागल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
सीसीटीव्हीत कैद झाला थरार
घटनेचा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. या दृश्यांमध्ये आरोपी पाठीमागून धावत येऊन महिलेवर हल्ला करताना दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या आधारे आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेतला जात आहे.
घाईगडबडीत पळताना आरोपीने आपली बॅग तसेच हल्ल्यासाठी वापरलेला कोयता घटनास्थळीच सोडल्याचे पोलिसांनी सांगितले. या वस्तू जप्त करण्यात आल्या असून त्यांची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे.
प्रकृती चिंताजनक
हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या स्नेहल सावंत यांना स्थानिक नागरिकांनी तत्काळ पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर स्वरूपाच्या जखमा असल्याने प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून रक्ताचे नमुने तसेच अन्य पुरावे संकलित केले.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीच्या शोधासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून संभाव्य ठिकाणी छापेमारी सुरू आहे.
हल्ल्यामागील कारण अद्याप अस्पष्ट
प्राथमिक तपासात आरोपी आणि जखमी महिला एकमेकांना ओळखत असल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक वाद, एकतर्फी आकर्षण किंवा इतर कोणत्या कारणातून हा हल्ला झाला का, याचा तपास पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे पालघर शहरात संतापाची लाट उसळली असून शासकीय महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भरदिवसा आणि गर्दीच्या परिसरात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी विविध स्तरांतून केली जात आहे.


