मोहाली वृत्तसंस्था
पंजाबमधील मोहाली येथे गुरुवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. एका खासगी लॉजिस्टिक्स कंपनीच्या कार्यालयात घुसून २९ वर्षीय तरुणीवर तिच्याच सहकाऱ्याने चाकूने सपासप वार करत निर्घृण हत्या केली. अवघ्या ३५ सेकंदांच्या कालावधीत सुमारे ३० वार करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, हा संपूर्ण प्रकार कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
సీసీటీవీ ఫుటేజ్..!
బ్రేకప్ చెప్పిందని ఆఫీసులోనే యువతిని దారుణంగా చంపిన ప్రియుడు
పంజాబ్ – మొహాలీలో ఒకే కంపెనీలో పనిచేస్తూ మూడేళ్లుగా ప్రేమలో ఉన్న డింపుల్(30), హర్జిందర్ సింగ్(39)
అయితే ఇటీవల యువతి బ్రేకప్ చెప్పడంతో ఆఫీసులోనే వెంటపడి కత్తితో దాడి చేసి చంపేసిన ప్రియుడు… pic.twitter.com/4dX6QNubRo
— Telugu Scribe (@TeluguScribe) June 5, 2026
मृत तरुणीचे नाव डिंपल असे असून, आरोपी हरविंदर उर्फ हॅरी हा देखील त्याच कंपनीत कार्यरत होता. प्राथमिक तपासात दोघांमध्ये पूर्वी प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांचे संबंध तुटल्यानंतर आरोपी मानसिक तणावात होता. त्याच रागातून ही घटना घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
कार्यालयातच केला जीवघेणा हल्ला
फेज-११ परिसरातील ‘एसआरपी लॉजिस्टिक्स लिमिटेड’च्या कार्यालयात सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सीसीटीव्ही फुटेजनुसार, डिंपल आपल्या डेस्कवर बसून काम करत असताना हरविंदर हातात चाकू घेऊन तिच्या मागून आला आणि अचानक हल्ला चढवला.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या डिंपलने जीव वाचवण्यासाठी कार्यालयाबाहेर पळण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने तिचा पाठलाग करत प्रवेशद्वाराजवळ गाठले आणि पुन्हा तिच्यावर वार केले. कार्यालयातील इतर कर्मचारी मदतीसाठी धावून आले, तरीही आरोपीने हल्ला सुरूच ठेवला. काही क्षणांतच तरुणी गंभीर जखमी होऊन कोसळली.
हल्ल्यानंतर स्वतःच्या गळ्यावरही चाकू फिरवला
डिंपलवर वार केल्यानंतर आरोपी हरविंदरने त्याच चाकूने स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेनंतर कार्यालयात एकच गोंधळ उडाला. जखमी अवस्थेतील दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी डिंपलला मृत घोषित केले. आरोपीवर उपचार सुरू असताना त्याचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिस १५ मिनिटांत घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तपासाबाबत माहिती देताना स्थानिक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी (SHO) अमन बैदवान यांनी सांगितले की, “सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घटना घडली. माहिती मिळाल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळाची पाहणी करून जैविक नमुने आणि इतर पुरावे जप्त केले आहेत. सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेण्यात आले आहे.”
तीन वर्षांची ओळख, नंतर प्रेमसंबंध
पोलिसांच्या माहितीनुसार, डिंपल आणि हरविंदर हे दोघेही मूळचे पटियाला येथील रहिवासी होते. गेल्या तीन वर्षांपासून ते एकाच कार्यालयात कार्यरत होते. याच काळात दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली आणि त्याचे रूपांतर प्रेमसंबंधांत झाले.
मात्र काही काळापूर्वी त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि संबंध तुटले. ब्रेकअपनंतर हरविंदरने पुन्हा नाते जुळवण्याचे अनेक प्रयत्न केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तथापि, त्याला यश न आल्याने तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला होता.
स्वतंत्र केबिनमध्ये काम, तरी नियोजनपूर्वक हल्ला
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांच्या केबिन एकमेकांपासून सुमारे पाच फूट अंतरावर होत्या. घटनेच्या दिवशी हरविंदर कार्यालयात चाकू घेऊन आला होता. त्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजित असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.
“प्राथमिक तपासात ही घटना एकतर्फी प्रेमभावना आणि नातेसंबंधातील वादातून घडल्याचे दिसून येत आहे. मात्र सर्व बाजूंनी तपास सुरू असून अंतिम निष्कर्ष फॉरेन्सिक अहवाल आणि इतर पुराव्यांनंतरच स्पष्ट होतील,” असे पोलिसांनी सांगितले.
सीसीटीव्ही आणि फॉरेन्सिक अहवालावर तपासाची भिस्त
या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने परीक्षण सुरू आहे. घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेले पुरावे फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. तपास यंत्रणा आरोपीच्या हालचाली, त्याच्या मोबाईलमधील माहिती आणि दोघांमधील संवादाचाही अभ्यास करत आहे.
कार्यालयाच्या सुरक्षिततेबाबत आणि कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नांबाबतही या घटनेनंतर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे. अवघ्या काही सेकंदांत घडलेल्या या रक्तरंजित घटनेने मोहालीसह संपूर्ण पंजाबमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.


