सातारा प्रतिनिधी
मुंबईच्या नरिमन पॉईंट येथील ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित एअर इंडिया इमारतीचे राज्य शासनाकडे हस्तांतरण झाल्यानंतर या वास्तूच्या नूतनीकरण आणि पुनर्विकास प्रक्रियेला गती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गुरुवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत इमारतीची पाहणी करून दुरुस्तीच्या कामांबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. इमारतीत शासकीय कार्यालये स्थलांतरित करण्यापूर्वी तिची सखोल संरचनात्मक (स्ट्रक्चरल) तपासणी करावी आणि दर्जाबाबत कोणतीही तडजोड न करता नागरिकांच्या सोयी-सुविधांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.
नरिमन पॉईंटसारख्या मुंबईतील सर्वाधिक महत्त्वाच्या व्यावसायिक परिसरात असलेली ही बहुमजली इमारत राज्य शासनाने एअर इंडिया असेट होल्डिंग कॉर्पोरेशनकडून तब्बल १६०१ कोटी रुपयांना संपादित केली आहे. मंत्रालय आणि इतर शासकीय कार्यालयांवरील वाढता ताण कमी करण्याच्या दृष्टीने ही खरेदी महत्त्वाची मानली जात आहे. इमारतीचा ताबा शासनाकडे आल्यानंतर तिच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्री भोसले यांनी प्रत्यक्ष भेट दिली.
पाहणीदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे, मुख्य अभियंता प्रज्ञा वाळके तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी इमारतीची रचना, उपलब्ध सुविधा, आवश्यक दुरुस्ती, तांत्रिक उन्नतीकरण आणि प्रस्तावित नूतनीकरणाच्या आराखड्याची माहिती मंत्र्यांना दिली.
यावेळी मंत्री भोसले यांनी इमारतीच्या दुरुस्ती आणि आधुनिकीकरणाची कामे दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून करण्याचे निर्देश दिले. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन इमारतीतील विद्युत यंत्रणा, अग्निसुरक्षा व्यवस्था, वातानुकूलन प्रणाली तसेच इतर तांत्रिक सुविधांचे आधुनिकीकरण करण्यात यावे. त्यासाठी उच्च प्रतीचे साहित्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारासह बाह्य भागाचे आकर्षक आणि दर्जेदार सुशोभीकरण करण्यासाठी नामांकित वास्तुविशारद व तज्ज्ञ संस्थांचे मार्गदर्शन घेण्याची सूचनाही त्यांनी केली. मुंबईच्या ओळखीचा भाग बनलेल्या या वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व जपत तिचे आधुनिक शासकीय संकुलात रूपांतर करण्यावर भर देण्यात यावा, असे त्यांनी नमूद केले.
राज्याच्या विविध भागांतून मंत्रालयीन आणि प्रशासकीय कामांसाठी मुंबईत येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या इमारतीत स्थलांतरित होणाऱ्या कार्यालयांमध्ये नागरिकांना सहज आणि सुलभ सेवा मिळतील, याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले. नागरिकांची सुरक्षितता, दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा, पुरेशी प्रतीक्षागृहे, आधुनिक तांत्रिक व्यवस्था आणि सुकर कार्यालयीन कामकाज या बाबींना प्राधान्य देण्यावर त्यांनी भर दिला.
कामांच्या अंमलबजावणीत अनावश्यक विलंब होऊ नये यासाठी सर्व प्रशासकीय मान्यता आणि आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. सर्व कामे निश्चित कालमर्यादेत आणि उच्च दर्जा राखून पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एअर इंडिया इमारत शासनाच्या ताब्यात आल्याने राज्य प्रशासनाला मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त, सुसज्ज आणि आधुनिक कार्यालयीन जागा उपलब्ध होणार आहे. यामुळे विविध विभागांचे कामकाज अधिक कार्यक्षम होण्यास मदत होईल. नागरिकांना एकाच ठिकाणी अधिकाधिक शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या वास्तूचा आदर्श शासकीय संकुल म्हणून विकास करण्यात येईल, असा विश्वास मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.


