आईने मंगळसूत्र गहाण ठेवून जपले मुलाचे कराटेचे स्वप्न; जिद्द, मेहनत आणि संघर्षाच्या जोरावर घडवले अनेक खेळाडू
सातारा प्रतिनिधी वृत्तसेवा
मुंबई : घरची हलाखीची परिस्थिती, बालपणापासून काम करण्याची वेळ आणि सुरुवातीच्या स्पर्धांमधील अपयश… अशा अनेक अडचणींवर मात करत अरविंद चव्हाण यांनी कराटेच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. खेळाडू, प्रशिक्षक, पंच आणि रेफरी अशा विविध भूमिका बजावत त्यांनी अनेक खेळाडू घडवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लंडनमध्ये दोन खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत तीन कांस्यपदके जिंकली आहेत.
अरविंद चव्हाण यांचा जन्म ८ मे १९८५ रोजी मुंबईत झाला. आई-वडील, तीन बहिणी आणि तीन भाऊ अशा कुटुंबाचा अंधेरीतील चाळीत संसार होता. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे वयाच्या अवघ्या ११व्या वर्षापासून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. महानगरपालिकेच्या शाळेतून दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी तांत्रिक महाविद्यालयात अकरावी आणि बारावीचे शिक्षण घेतले.
मुलगा चुकीच्या संगतीत जाऊ नये, या विचाराने त्यांच्या आईने त्यांना लहान वयातच कराटे प्रशिक्षक शिहान संदीप गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणासाठी पाठवले. संदीप गाडे सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कराटेचे धडे गिरवत ब्लॅक बेल्ट मिळवला. सुरुवातीच्या काळात अनेक स्पर्धांमध्ये अपयश आले, मात्र त्यांनी जिद्द सोडली नाही. सातत्याने मेहनत घेतल्यानंतर पहिले पदक मिळाले आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
आईने मंगळसूत्र गहाण ठेवून पूर्ण केले स्वप्न
कराटेच्या ब्लॅक बेल्ट परीक्षेसाठी पैसे नसताना त्यांच्या आईने स्वतःचे मंगळसूत्र गहाण ठेवून परीक्षेची फी भरली. मुलाचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी आईने केलेल्या या त्यागाची आठवण अरविंद चव्हाण आजही भावूक होऊन सांगतात. या घटनेला जवळपास ३० वर्षे उलटली असली, तरी आईच्या त्यागाचे महत्त्व त्यांच्या मनात कायम आहे.
अनेक वर्षे खेळाडू म्हणून कराटे स्पर्धांमध्ये सहभागी होताना त्यांनी प्रशिक्षकाची जबाबदारीही सांभाळली. अनेक खेळाडूंना प्रशिक्षण देऊन त्यांनी त्यांना घडवले. वयाच्या ३५ वर्षांपर्यंत खेळत राहून स्पर्धांमध्ये विजय मिळवत त्यांनी नव्या खेळाडूंसमोर आदर्श निर्माण केला.
नेपाळपासून लंडनपर्यंत यशस्वी वाटचाल
२००७ मध्ये त्यांना पहिल्यांदा नेपाळ येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करत त्यांनी आपल्या कुटुंबाची मान अभिमानाने उंचावली. त्यानंतर नेपाळ, श्रीलंका, दुबई, मलेशिया, थायलंड, जपान, भूतान आणि लंडन अशा विविध ठिकाणी त्यांनी खेळाडू, प्रशिक्षक, पंच आणि रेफरी म्हणून काम केले.
महाराष्ट्र राज्याच्या वतीने त्यांनी आतापर्यंत तीन वेळा शालेय स्तरावरील कराटे स्पर्धांसाठी संघाचे नेतृत्व प्रशिक्षक म्हणून केले. खेळाडूंना योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देत प्रत्येक वेळी संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याचा प्रयत्न केला. आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली लंडनमध्ये दोन खेळाडूंनी तीन कांस्यपदके जिंकत यश संपादन केले आहे. संघर्षातून सुरू झालेला अरविंद चव्हाण यांचा हा प्रवास आज अनेक नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


