ग्लासगो:
ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय बॉक्सर्सनी अभूतपूर्व कामगिरी करत 96 वर्षांच्या राष्ट्रकुल इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. भारताच्या बॉक्सिंग संघाने तब्बल 7 सुवर्ण आणि 3 रौप्य अशी एकूण 10 पदके जिंकत राष्ट्रकुल स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. विशेष म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात भारतीय बॉक्सिंगला प्रथमच दुहेरी आकड्यात पदकांची कमाई करता आली असून, ही कामगिरी भारतीय क्रीडा इतिहासातील सुवर्णक्षण मानली जात आहे.
HISTORIC MOMENT FOR INDIA AT CWG 2026! 🥇🇮🇳
Brilliant performance from Preeti Pawar to secure the Women's 54kg Gold medal at CWG 2026. Making the entire nation proud with this historic first boxing gold of the campaign! 🥇
Many congratulations! 🎉👏 #PreetiPawar…
— Dailydose of Sports (@suuuuspeed) August 1, 2026
यंदाच्या स्पर्धेत नेमबाजी, बॅडमिंटन आणि कुस्ती यांसारख्या भारतासाठी पदकांची मोठी आशा असलेल्या खेळांचा समावेश नसल्याने भारताच्या एकूण पदकसंख्येत घट होईल, अशी शक्यता क्रीडा तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. मात्र भारतीय खेळाडूंनी सर्व अंदाज खोटे ठरवत बॉक्सिंग, ज्युडो, वेटलिफ्टिंग आणि अॅथलेटिक्समध्ये दमदार प्रदर्शन केले. विशेषतः बॉक्सर्सनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारताचे पदकतालिकेतील स्थान अधिक मजबूत झाले.
या यशात भारतीय महिला बॉक्सर्सचा सिंहाचा वाटा राहिला. महिला संघाने रिंगमध्ये वर्चस्व गाजवत 5 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक जिंकले. प्रीती पवार, जॅस्मिन, साक्षी, प्रिया घंघास आणि अरुंधती चौधरी यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदके पटकावली. तर ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लव्हलिना बोरगोहेन हिने प्रथमच राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकत आपल्या कारकिर्दीत आणखी एका मोठ्या यशाची भर घातली.
पुरुष विभागातही भारतीय बॉक्सर्सनी निराश केले नाही. सचिन आणि अंकुश यांनी दमदार खेळ करत भारताला दोन सुवर्णपदके मिळवून दिली. तर जादुमणी आणि नरेंद्र यांनी रौप्यपदकांची कमाई केली. विशेषतः 90 किलोहून अधिक वजनी गटात नरेंद्रने गाठलेल्या अंतिम फेरीमुळे भारताचे दहावे पदक निश्चित झाले आणि भारतीय बॉक्सिंगचा ऐतिहासिक विक्रम पूर्ण झाला.
या शानदार कामगिरीच्या जोरावर स्पर्धेचा अखेरचा दिवस बाकी असतानाच भारताच्या खात्यात 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 8 कांस्य अशी एकूण 38 पदके जमा झाली आहेत. त्यामुळे भारताने पदकतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली असून, उर्वरित स्पर्धेत आणखी पदकांची आशा कायम आहे.
भारतीय बॉक्सिंगच्या प्रवासाकडे पाहिले तर हा विक्रम अधिकच महत्त्वाचा ठरतो. भारताने 1934 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण केले; मात्र बॉक्सिंगमधील पहिले पदक मिळवण्यासाठी तब्बल 1998 पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर 2002 मध्ये मोहम्मद अली कमर यांनी भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. त्याच परंपरेला नवी उंची देत 2026 मध्ये भारतीय बॉक्सर्सनी इतिहासातील सर्वात मोठी पदककमाई करत भारतीय बॉक्सिंगचा सुवर्णकाळ सुरू झाल्याची प्रचिती दिली आहे.
भारतीय बॉक्सर्सच्या या ऐतिहासिक यशामुळे देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि ऑलिम्पिकसाठीही भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.


