मुंबई प्रतिनिधी
मुंबई : १ जून २०२६ पासून देशभरात अनेक महत्त्वाचे आर्थिक बदल लागू झाले असून त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवर होणार आहे. विशेषतः विविध बँकांच्या क्रेडिट कार्डांशी संबंधित नियमांमध्ये बदल करण्यात आल्याने लाखो कार्डधारकांच्या खर्चावर आणि मिळणाऱ्या लाभांवर परिणाम होणार आहे.
कोटक महिंद्रा बँकेने आपल्या क्रेडिट कार्डधारकांसाठी युटिलिटी बिल, इंधन, घरभाडे आणि विमा प्रीमियमवरील रिवॉर्ड पॉईंट्ससाठी नवीन मर्यादा लागू केली आहे. तसेच रिवॉर्ड पॉईंट्सच्या रिडेम्प्शन व्हॅल्यूतही कपात करण्यात आली आहे. घरभाडे आणि शैक्षणिक शुल्क भरण्यावर १ टक्का व्यवहार शुल्क आकारले जाणार आहे. ठरावीक मर्यादेपेक्षा अधिक युटिलिटी बिल, वॉलेट लोड, ऑनलाइन गेमिंग आणि इंधन खर्चावरही १ टक्का शुल्क लागू होणार आहे. मात्र, व्हाइट रिझर्व्ह, सॉलिटेअर, इन्फिनिट, सिग्नेचर, इंडियन ऑईल आणि मिंत्रा कोटक कार्डधारकांना इंधन शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
दरम्यान, बँक ऑफ बडोदाने ‘वन को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड’वरील थकबाकीवरील मासिक व्याजदर ३.४९ टक्क्यांवरून ३.७५ टक्के करण्याचा निर्णय घेतला असून हा बदल २३ जूनपासून लागू होणार आहे. आयसीआयसीआय बँकेनेही १८ जूनपासून ‘अॅमेझॉन पे क्रेडिट कार्ड’द्वारे घरभाडे भरल्यास मिळणारा १ टक्का रिवॉर्ड पॉईंटचा लाभ बंद करण्याची घोषणा केली आहे.
याशिवाय एचडीएफसी बँकेने एसएमएस अलर्ट प्रणालीत बदल केला आहे. २५ जूनपासून यूपीआय व्यवहारांमध्ये पैसे पाठवताना १०० रुपयांपेक्षा अधिक आणि खात्यात पैसे जमा होताना ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांवरच एसएमएस अलर्ट पाठवले जाणार आहेत. मात्र, सर्व व्यवहारांची माहिती ई-मेलद्वारे उपलब्ध राहणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, ग्राहकांनी क्रेडिट कार्डचा वापर करताना नव्या नियमांची माहिती घेणे, खर्चाचे नियोजन करणे आणि थकबाकी वेळेत भरणे आवश्यक आहे. तसेच रिवॉर्ड पॉईंट्सचा योग्य वापर केल्यास अतिरिक्त शुल्काचा भार टाळता येऊ शकतो.


