नवी दिल्ली वृत्तसंस्था
म्यानमारचे राष्ट्रपती यू मिन आँग ह्लाइंग पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून, त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात बिहारमधील महाबोधी विहार येथे दर्शन व प्रार्थना करून केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी होणाऱ्या महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चेपूर्वी घेतलेल्या या भेटीमुळे भारत-म्यानमार संबंधांतील बौद्ध, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक धाग्यांना नव्याने अधोरेखित करण्यात आले आहे.
बौद्ध धर्मीयांसाठी जगातील सर्वाधिक पवित्र स्थळांपैकी एक मानल्या जाणाऱ्या बोधगयाला म्यानमारमध्ये विशेष धार्मिक महत्त्व आहे. बौद्ध बहुसंख्य असलेल्या म्यानमारचे राष्ट्रपती आँग ह्लाइंग यांनी राजनैतिक चर्चांपूर्वी महाबोधी विहारात प्रार्थना करण्याचा निर्णय घेतल्याने दोन्ही देशांतील सांस्कृतिक जवळीक पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. बिहारचे राज्यपाल सय्यद सय्यद अता हसनैन यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी या भेटीचे स्वागत करताना म्हटले की, राष्ट्रपती आँग ह्लाइंग यांचा बोधगया दौरा हा भारत आणि म्यानमार यांच्यातील आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि लोकांमधील दृढ संबंधांचे प्रतीक आहे.
फेब्रुवारी २०२१ मध्ये म्यानमारमध्ये लष्करी सत्तांतर घडवून आणणाऱ्या नेतृत्वाच्या केंद्रस्थानी आँग ह्लाइंग होते. अलीकडेच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर त्यांनी राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारली असून, राष्ट्रपती म्हणून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग उपस्थित होते.
१ जून रोजी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती आँग ह्लाइंग यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार आहे. भारत आणि म्यानमार यांच्यात सुमारे १,६४० किलोमीटर लांबीची सीमा असून ती मणिपूर, नागालँड, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांना लागून आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातील सुरक्षा, दहशतवादविरोधी सहकार्य, सीमाव्यवस्थापन आणि शांतता राखण्याचे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.
याशिवाय, सीमापार संपर्क वाढविणारे रस्ते आणि पायाभूत सुविधा प्रकल्प, व्यापारवृद्धी, गुंतवणूक, ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य आणि संरक्षणविषयक संबंध मजबूत करण्यावरही चर्चा होण्याची अपेक्षा आहे. भारताच्या ‘शेजारी प्रथम’ आणि ‘अॅक्ट ईस्ट’ धोरणात तसेच हिंदी महासागर क्षेत्रातील ‘महासागर’ दृष्टीकोनात म्यानमारचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
दिल्लीतील अधिकृत बैठकीनंतर राष्ट्रपती आँग ह्लाइंग २ जून रोजी मुंबईला भेट देणार आहेत. त्यांच्यासोबत कॅबिनेट मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधींचे शिष्टमंडळही आले आहे. मुंबई दौऱ्यात भारतीय उद्योगजगताशी संवाद साधणे, व्यापार व गुंतवणुकीच्या नव्या संधींचा आढावा घेणे आणि संभाव्य व्यावसायिक करारांवर चर्चा करणे यावर भर दिला जाणार आहे.
भारत आणि म्यानमार यांच्यातील संबंधांना केवळ सामरिक किंवा आर्थिक नव्हे, तर शतकानुशतके जपलेल्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचीही मजबूत पार्श्वभूमी आहे. त्यामुळे बोधीवृक्षाच्या सावलीत सुरू झालेली ही दिल्लीवारी दोन्ही देशांच्या संबंधांना नवी दिशा देणारी ठरणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.


