नवी दिल्ली वृत्तसंस्था:
आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये पुन्हा एकदा आपली अभेद्य ताकद सिद्ध करत भाजपसह सर्व विरोधकांना धक्का दिला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘आप’ने अक्षरशः झंझावाती विजय मिळवत तब्बल ६८० हून अधिक जागांवर विजयाचा झेंडा फडकावला आहे. दुसरीकडे भारतीय जनता पार्टीला अवघ्या ५२ जागांवर समाधान मानावे लागल्याने पक्षासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलालाही या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे.
पंजाबमध्ये २६ मे रोजी आठ महानगरपालिका, ७५ नगर परिषद आणि २० नगर पंचायतींसाठी मतदान पार पडले होते. या निवडणुकांकडे आगामी विधानसभा निवडणुकीची ‘सेमीफायनल’ म्हणून पाहिले जात होते. त्यामुळे सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची लढाई मानून जोरदार प्रचार केला होता. मात्र मतमोजणी सुरू होताच ‘आप’च्या उमेदवारांनी सर्वच भागांत आघाडी घेत विरोधकांना धूळ चारली.
‘आप’ची जादू कायम; पंजाबमध्ये विरोधकांचा पूर्णपणे सफाया
पंजाब विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतरही ‘आप’ची लोकप्रियता कमी झालेली नाही, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भाग असो वा शहरी मतदारसंघ, सर्वत्र मतदारांनी पुन्हा एकदा ‘आप’च्या बाजूने कौल दिला. स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि भ्रष्टाचारविरोधी प्रतिमा याचा पक्षाला मोठा फायदा झाल्याचे मानले जात आहे.
विशेष म्हणजे, भाजपने निवडणुकीपूर्वी संघटनात्मक पातळीवर मोठे बदल करत नव्या नेतृत्वावर भर दिला होता. केवलसिंग धिल्लोन यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. नव्या नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण होईल आणि आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला बळ मिळेल, अशी भाजपची अपेक्षा होती. मात्र निकालांनी भाजपच्या सर्व अपेक्षांवर पाणी फेरल्याचे दिसून आले.
भाजपसाठी धोक्याची घंटा
राजकीय विश्लेषकांच्या मते, हा निकाल भाजपसाठी केवळ पराभव नाही तर पंजाबमधील कमकुवत जनाधाराचे स्पष्ट संकेत आहेत. राष्ट्रीय मुद्द्यांपेक्षा स्थानिक प्रश्न पंजाबच्या मतदारांसाठी अधिक महत्त्वाचे ठरत असल्याचे या निकालातून अधोरेखित झाले आहे. शेतकरी प्रश्न, बेरोजगारी, स्थानिक विकास आणि प्रशासनातील हस्तक्षेप यासारख्या मुद्द्यांवर मतदारांनी स्पष्ट भूमिका घेतल्याचे मानले जात आहे.
भाजपला पंजाबमध्ये अद्याप ठोस संघटनात्मक ताकद उभी करता आलेली नाही, हे या निकालातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले. दुसरीकडे ‘आप’ने मात्र गावपातळीपासून शहरांपर्यंत मजबूत पकड निर्माण करत राज्यात नंबर वन पक्ष असल्याचे सिद्ध केले आहे.
काँग्रेस-अकाली दलालाही मोठा फटका
या निवडणुकीत केवळ भाजपच नव्हे, तर काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलालाही मोठा धक्का बसला आहे. अनेक ठिकाणी पारंपरिक मतदारांनीही ‘आप’कडे कल दर्शवल्याने विरोधकांची चिंता वाढली आहे. पंजाबच्या राजकारणात अनेक दशकं प्रभाव असलेल्या अकाली दलासाठी हा निकाल अधिक धक्कादायक मानला जात आहे.
विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल आता आगामी विधानसभा निवडणुकांचे संकेत मानले जात आहेत. ‘आप’ने या विजयामुळे आत्मविश्वास दुणावला असून विरोधकांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. दुसरीकडे भाजप, काँग्रेस आणि अकाली दलासाठी हा निकाल आत्मपरीक्षणाची वेळ असल्याचे बोलले जात आहे.
पंजाबमध्ये सध्या तरी ‘आप’चे राजकीय वर्चस्व कायम असल्याचे या निकालाने अधोरेखित केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांना नव्याने रणनीती आखावी लागणार असून पंजाबचे राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.


