नवी दिल्ली वृत्तसंस्था
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालमधील कथित घुसखोरांना कडक शब्दांत इशारा देत, ‘‘शक्य तेवढ्या लवकर स्वतःहून आपल्या देशात परत जा,’’ असे स्पष्ट शब्दांत सांगितले. भारत-बांगलादेश सीमेवरील सुरक्षेला अधिक मजबूत करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) मोठ्या प्रमाणात जमीन सुपूर्द केल्याची माहितीही त्यांनी दिली.
गांधीनगर येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी सांगितले की, पश्चिम बंगालमध्ये नव्याने सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने अवघ्या सात दिवसांत बांगलादेश सीमेलगत कुंपण उभारणी, चौक्या आणि सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी बीएसएफकडे तब्बल ६०० हेक्टर जमीन हस्तांतरित केली आहे. या निर्णयामुळे सीमाभागातील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम होणार असल्याचा दावा त्यांनी केला.
‘दिलेलं वचन पूर्ण केलं’
अमित शाह म्हणाले, ‘‘निवडणूक प्रचारादरम्यान आम्ही जनतेला आश्वासन दिलं होतं की, सत्ता मिळाल्यानंतर काही दिवसांतच सीमाभागातील कुंपणाचं काम वेगाने सुरू करू. आज आम्ही ते वचन पूर्ण करून दाखवलं आहे.’’
सीमेवरील सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या भागांमध्ये बीएसएफच्या चौक्या उभारण्यासाठी आणि काटेरी तारांचे कुंपण मजबूत करण्यासाठी ही जमीन देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी त्यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
यांचे विशेष अभिनंदनही केले.
‘चिकन नेक’ परिसरातील १२१ हेक्टर जमीन केंद्राकडे
देशाच्या सामरिक सुरक्षेसाठी अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या ‘चिकन नेक’ परिसरातील १२१ हेक्टर जमीनही केंद्र सरकारकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती शाह यांनी दिली. ईशान्य भारताला उर्वरित देशाशी जोडणारा हा अरुंद भूभाग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या भागातील सुरक्षाव्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष लक्ष केंद्रित केल्याचे त्यांनी नमूद केले.
‘‘ममता सरकारच्या काळात रोज घुसखोरी’’
अमित शाह यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पूर्वीच्या सरकारवरही टीका केली. ‘‘पूर्वीच्या राजवटीत दररोज घुसखोरी होत होती. मात्र आता सत्तापरिवर्तन झाल्यानंतर सीमाभागातील परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. घुसखोरी मोठ्या प्रमाणात कमी झाली असून अनेक घुसखोर स्वतःहून मायदेशी परतू लागले आहेत,’’ असा दावा त्यांनी केला.
विकासकामांच्या उद्घाटनावेळी विधान
गांधीनगर दौऱ्यादरम्यान अमित शाह यांनी पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, सुशोभित अंगणवाडी केंद्रे, ग्रामविकास प्रकल्प आणि स्थानिक पायाभूत सुविधांशी संबंधित विविध विकासकामांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा, सीमाभागातील परिस्थिती आणि केंद्र सरकारच्या धोरणांवरही भाष्य केले.
दरम्यान, अमित शाह यांच्या या विधानामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात नव्याने आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सीमासुरक्षा, घुसखोरी आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आगामी काळात पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी येण्याची चिन्हे आहेत.


