नाशिक प्रतिनिधी
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चांदवड येथे मोठा मोर्चा काढण्यात आला. संतप्त शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
शेतकऱ्यांची मुख्य मागणी म्हणजे सरकारने कांद्याची खरेदी प्रतिक्विंटल तीन हजार रुपये दराने करावी आणि यापूर्वी विक्री झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल पंधराशे रुपयांचे अनुदान द्यावे.
आंदोलनात विरोधी पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती
या महामोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते.
नेत्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत सरकारवर जोरदार टीका केली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला.
“सरकारकडून कांदा उत्पादकांची दिशाभूल”
आंदोलनावेळी बोलताना आमदार अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला. “शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळाला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. सरकार भाव जाहीर करत आहे, पण प्रत्यक्षात खरेदी होत नाही. केवळ घोषणा करून काही उपयोग नाही,” असे ते म्हणाले.
सरकारने एखाद्या शेतकऱ्याला जाहीर केलेला भाव दिल्याची पावती दाखवावी, असे आव्हानही त्यांनी दिले. कांदा उत्पादक शेतकरी आणि जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
“कांद्याला किमान 24 रुपये भाव द्या”
आमदार रोहित पवार यांनीही सरकारवर टीका करत कांद्याला किमान 24 रुपये प्रतिकिलो दर देण्याची मागणी केली. “2023 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कांद्याला 24 रुपये भाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता निवडणूक संपल्यानंतर दर कमी करण्यात आले,” असा आरोप त्यांनी केला.आंदोलनानंतर सरकारने साडेपंधरा रुपयांचा दर जाहीर केला असला तरी त्यातून शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही”
रोहित पवार म्हणाले की, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या कांद्याचा उत्पादन खर्च 18 ते 19 रुपये प्रतिकिलोपर्यंत जात आहे. “शेतकऱ्यांचा निम्मा खर्चही निघत नाही. त्यामुळे कांद्याला किमान 24 रुपये भाव मिळालाच पाहिजे. अन्यथा शेतकऱ्यांनी जगायचे कसे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच नाफेडने कांद्याची खरेदी वाढवून तो परदेशात निर्यात करावा आणि यापूर्वी कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना 10 रुपये अनुदान द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली.
“सत्ताधारी विधान परिषद जागांसाठी व्यस्त”
सत्ताधारी पक्षावर टीका करताना रोहित पवार म्हणाले की, “एकीकडे शेतकरी संकटात सापडला आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी नेते विधान परिषदेच्या जागांवर चर्चा करण्यात व्यस्त आहेत.” शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी सरकारने तातडीने मदत करावी आणि त्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहावे, असेही त्यांनी म्हटले.
रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ ताब्यात
दरम्यान, आंदोलनादरम्यान पोलिसांनी आमदार रोहित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना ताब्यात घेतले. या कारवाईनंतर आंदोलन आणखी चिघळल्याचे दिसून आले. आंदोलनस्थळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.


