मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील नामांकित हॉटेलांमध्ये अन्नसुरक्षेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे धक्कादायक वास्तव अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) तपासणीत उघड झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विशेष तपासणी मोहिमेत भेंडीबाजारमधील शालिमार हॉटेल, नूर मोहम्मदी हॉटेल आणि उमरखाडीतील रहमानिया रेस्टॉरंट येथे गंभीर अनियमितता आढळल्याने या तिन्ही आस्थापनांचे खाद्य व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे मुंबईतील हॉटेल व्यवसायात मोठी खळबळ उडाली आहे.
एफडीएने गेल्या काही महिन्यांपासून राज्यभर अन्नसुरक्षा नियमांची अंमलबजावणी अधिक कठोर केली असून, ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आस्थापनांविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारले आहे. त्याचाच भाग म्हणून या तिन्ही नामांकित हॉटेलांची तपासणी करण्यात आली होती.
भेंडीबाजारमधील मे. शालिमार हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. या हॉटेलची १६ एप्रिल रोजी प्राथमिक तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास आल्यानंतर २८ एप्रिल रोजी व्यवस्थापनाला त्या दूर करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, १३ जुलै रोजी झालेल्या पुनर्तपासणीत तब्बल २५ गंभीर त्रुटी कायम असल्याचे आढळून आले.
तपासणीत स्वयंपाकघरातील ओले व घसरडे मजले, कच्च्या मालाच्या खरेदी व साठवणुकीची कोणतीही नोंद नसणे, पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी न करणे, खाद्यतेलाच्या गुणवत्तेच्या नोंदींचा अभाव, शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थ वेगवेगळे ठेवण्याची व्यवस्था नसणे तसेच कीटकप्रतिबंधक जाळीशिवाय उघड्या खिडक्या अशा गंभीर बाबी समोर आल्या. या पार्श्वभूमीवर १४ जुलै रोजी हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला.
दरम्यान, भेंडीबाजारातीलच प्रसिद्ध नूर मोहम्मदी हॉटेलची १३ जुलै रोजी करण्यात आलेल्या तपासणीत अत्यंत धक्कादायक परिस्थिती उघड झाली. स्वयंपाकघराच्या छतावर तेलाचे जाड काळे थर साचलेले होते. कबाब विभागाजवळ उघड्या खिडक्यांमुळे माशा, कीटक आणि कावळ्यांचा मुक्त वावर असल्याचे निरीक्षणात आले. याशिवाय भिंती व छतांवरील निघालेला रंग, कच्च्या मालाची अस्वच्छ साठवण, पुरवठादारांच्या नोंदींचा अभाव, जीर्ण व अस्वच्छ भांड्यांचा वापर, पिण्याच्या पाण्याच्या तपासणीच्या नोंदी नसणे आणि प्रभावी कीटक नियंत्रण व्यवस्था नसल्याचेही आढळले. या गंभीर त्रुटींची दखल घेत एफडीएने १४ जुलै रोजी हॉटेलचा परवाना तात्काळ निलंबित केला.
उमरखाडीतील रहमानिया रेस्टॉरंटची तपासणीही १३ जुलै रोजी करण्यात आली. येथे अन्नपदार्थ, रसायने आणि पॅकेजिंग साहित्याची साठवण अत्यंत अयोग्य पद्धतीने करण्यात येत असल्याचे आढळले. कीटकप्रतिबंधक नसलेले दरवाजे, गंजलेली व निकृष्ट दर्जाची उपकरणे, भिंती व छतावरील निघालेला प्लास्टर, अन्नपदार्थांच्या आवश्यक प्रयोगशाळा चाचण्यांच्या नोंदींचा अभाव तसेच पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी न केल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले. या सर्व बाबी लक्षात घेऊन या रेस्टॉरंटचाही परवाना त्याच दिवशी निलंबित करण्यात आला.
या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. अन्नसुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य व्यवसायांवर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, “ग्राहकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. अन्नसुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या कोणत्याही हॉटेल, रेस्टॉरंट किंवा खाद्य व्यवसायाला कोणतीही सवलत दिली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई केली जाईल.”
मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलांवर झालेल्या या कारवाईमुळे खाद्य व्यवसाय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, इतर हॉटेल व रेस्टॉरंट चालकांनीही अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने एफडीएची ही मोहीम आगामी काळात आणखी व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.


