हिंगोली प्रतिनिधी
औंढा नागनाथ मंदिर परिसरातील मंदिर संस्थांच्या भक्त निवासात पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळून आल्याने हिंगोली जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर कदम असे मृत पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून ते गेल्या ११ महिन्यांपासून महाराष्ट्र पोलीस दलात औंढा नागनाथ शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या अकस्मात निधनामुळे सहकारी अधिकारी आणि परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर कदम हे काही महिन्यांपासून औंढा नागनाथ मंदिर परिसरात बंदोबस्त व अन्य कर्तव्यांवर नियुक्त होते. ड्युटीनंतर ते मंदिर संस्थांच्या भक्त निवासात विश्रांतीसाठी थांबत असत. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या रुममधून कोणतीही हालचाल दिसत नव्हती. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास संबंधित खोलीतून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने स्थानिक नागरिकांनी तत्काळ औंढा नागनाथ पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.
पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर दरवाजा उघडून पाहणी करण्यात आली असता ज्ञानेश्वर कदम यांचा मृतदेह खोलीत आढळून आला. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. प्राथमिक तपासात त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम यांना काही काळापासून एका आजाराने ग्रासले होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीसंदर्भातही तपास केला जात आहे.
या संदर्भात औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणपत राहिरे यांनी सांगितले की, “ज्ञानेश्वर कदम हे कर्तव्यदक्ष अधिकारी होते. मंदिर परिसरातील जबाबदाऱ्या ते प्रामाणिकपणे पार पाडत होते. ड्युटीनंतर विश्रांतीसाठी ते भक्त निवासात गेले असावेत. नेमका मृत्यू कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे.”
दरम्यान, ज्ञानेश्वर कदम यांच्या मृतदेहाचे औंढा नागनाथ उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्यांचे मूळ गाव रांजाळा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी, नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्ञानेश्वर कदम यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा आणि नातवंड असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.
या घटनेनंतर हिंगोलीचे पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनीही दुःख व्यक्त केले. “ज्ञानेश्वर कदम हे जबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी होते. त्यांच्या निधनाने पोलीस दलाचे मोठे नुकसान झाले आहे. कदम कुटुंबीयांच्या पाठीशी पोलीस प्रशासन ठामपणे उभे राहील,” असे आश्वासन त्यांनी दिले.


