हिंगोली प्रतिनिधी
हिंगोली जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांची मालिका सुरूच असून कळमनुरी तालुक्यातील साळवा येथे एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातच आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. कर्जबाजारीपणाच्या विवंचनेतून ४८ वर्षीय शेतकऱ्याने शेतातील पऱ्हाटीच्या (कापसाच्या पराट्या) ढिगाऱ्यावर बसून स्वतःला पेटवून घेत जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दत्तराव दिगंबर माखणे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. माखणे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या नावे सुमारे अडीच एकर शेती होती. शेतीसाठी घेतलेले बँकेचे कर्ज तसेच खाजगी सावकारांचे देणे यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले होते. गेल्या काही दिवसांपासून कर्जफेडीच्या चिंतेमुळे ते मानसिक तणावाखाली असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
मंगळवारी रात्री शेतात जाऊन येतो, असे सांगून ते घराबाहेर पडले. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या कुटुंबीयांनी शेतात जाऊन शोध घेतला असता पऱ्हाटीच्या साठवलेल्या ढिगाऱ्याजवळ त्यांचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासानुसार त्यांनी पऱ्हाटीच्या ढिगाऱ्यावर बसून स्वतःवर ज्वलनशील पदार्थ ओतून आग लावल्याचे समोर आले आहे.
उद्याच्या उत्पन्नाची आशा असलेल्या त्याच पऱ्हाटीच्या ढिगाऱ्यावर बसून शेतकऱ्याने जीवन संपविल्याची बाब ग्रामस्थांनाही चटका लावणारी ठरली. माखणे यांच्या पश्चात पत्नी व मुले असा परिवार आहे. खाजगी सावकारांच्या तगाद्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात होत आहे.
या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अलीकडेच ‘शेतकरी आत्महत्या प्रतिबंध टास्क फोर्स’ची स्थापना केली आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक, मानसिक तसेच हवामान बदलाशी संबंधित अडचणींचा एकत्रित अभ्यास करून उपाययोजना सुचविणे हा या कृती दलाचा उद्देश असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.


