हिंगोली प्रतिनिधी
मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांत गुरुवारी मध्यरात्रीनंतर सलग चार भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे व काकडधाबा परिसर हे या भूकंपांचे केंद्रबिंदू होते. पहिला आणि सर्वाधिक तीव्र धक्का ४.६ रिश्टर स्केलचा नोंदविण्यात आला. काही गावांमध्ये धक्का बसण्यापूर्वी जमिनीखालून मोठा गूढ आवाज ऐकू आल्याचे नागरिकांनी सांगितले.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) आणि स्थानिक भूकंपमापन केंद्राच्या माहितीनुसार, पहिला धक्का पहाटे १.३७ वाजता बसला. त्याची तीव्रता ४.६ रिश्टर स्केल असून केंद्रबिंदू पांग्रा शिंदे गावाच्या दक्षिणेस सुमारे १० किलोमीटर खोलीवर होता. त्यानंतर पहाटे २.१५ वाजता ३.६ रिश्टर स्केल, २.१७ वाजता ३.९ रिश्टर स्केल आणि ३.२३ वाजता आणखी एक सौम्य धक्का नोंदविण्यात आला. दुसरा व तिसरा धक्का काकडधाबा परिसरात केंद्रित होता.
या धक्क्यांचे परिणाम हिंगोली शहर, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ तसेच शेजारील परभणी आणि नांदेड जिल्ह्यांतील अनेक भागांत जाणवले. नागरिक गाढ झोपेत असताना अचानक भूकंप झाल्याने अनेकांनी घराबाहेर धाव घेतली. काही गावांमध्ये मंदिरांवरील ध्वनिक्षेपकांच्या माध्यमातून नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह अनेकांनी रात्रभर मोकळ्या जागेतच आश्रय घेतला.
प्राथमिक माहितीनुसार, पांग्रा शिंदे आणि काकडधाबा परिसरातील काही जुन्या व मातीच्या घरांच्या भिंतींना तडे गेले असून किरकोळ नुकसान झाले आहे. मात्र, कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून भूकंपाचे धक्के वारंवार जाणवत आहेत. ११ एप्रिल २०२६ रोजी ४.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यानंतर २ जुलै रोजीही अवघ्या दहा तासांच्या अंतराने दोन धक्के बसले होते. त्यामुळे आठवडाभरात पुन्हा झालेल्या या भूकंपामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.
भूगर्भातील अंतर्गत हालचाली, स्थानिक भूगर्भरचना आणि पावसाळ्यात जमिनीत होणाऱ्या पाण्याच्या दाबातील बदल यांमुळे या परिसरात सूक्ष्म ते मध्यम तीव्रतेचे भूकंप वारंवार होत असल्याचे भूकंपतज्ज्ञांनी नमूद केले आहे. परिस्थितीवर प्रशासन आणि संबंधित यंत्रणांचे लक्ष असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


