यवतमाळ प्रतिनिधी
विदर्भात सध्या उष्णतेने कहर केला असून तापमानाचा पारा ४० ते ४५ अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचला आहे. माणसांसह वन्यजीवांचेही या भीषण उकाड्याने हाल होत आहेत. अशातच यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात घडलेली एक हृदयस्पर्शी घटना संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेत आहे. तहानेने व्याकूळ झालेल्या एका माकडाने चक्क धावती एसटी बस अडवून पाण्यासाठी आर्त विनवणी केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Heart-Wrenching Scenes in Maharashtra's Vidarbha: Thirsty Monkeys Beg For Water Amid Extreme Heat pic.twitter.com/4dxE1Y3Xdb
— NDTV (@ndtv) May 21, 2026
ही घटना बुधवारी दुपारी पुसदजवळील खंडाळा घाट परिसरात घडली. धुळे-यवतमाळ ही एसटी बस वाशिममार्गे पुसदकडे जात असताना अचानक घाटातील एका वळणावर एक माकड रस्त्याच्या मध्यभागी येऊन उभे राहिले. चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ बस थांबवली. सुरुवातीला प्रवाशांना वाटले की माकड रस्ता ओलांडण्यासाठी थांबले असेल, मात्र ते सतत बससमोरच घुटमळत राहिले. जणू काही ते मदतीसाठी हाक देत होते.
तहानेने व्याकूळ माकडाची पाण्यासाठी धडपड
बस थांबल्यानंतर काही प्रवाशांनी त्या माकडाच्या हालचाली बारकाईने पाहिल्या. ते भुकेले नसून प्रचंड तहानलेले असल्याचे लक्षात आले. त्यानंतर एका प्रवाशाने खिडकीतून पाण्याची बाटली पुढे केली. पाणी दिसताच माकडाने अक्षरशः झडप घालत ती बाटली हातात घेतली आणि घटाघटा पाणी प्यायला सुरुवात केली.
हे दृश्य पाहून बसमधील अनेक प्रवासी भावुक झाले. विशेष म्हणजे काही क्षणांतच आसपासच्या जंगलातून इतर माकडेही रस्त्यावर आली. तीही पाण्यासाठी व्याकूळ झालेली दिसत होती. प्रवाशांनी आपल्या जवळील पाण्याच्या बाटल्या बाहेर काढून या मुक्या जीवांची तहान भागवली. काही वेळ घाट परिसरात हा भावनिक क्षण अनुभवायला मिळाला.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बसमधील प्रवासी लता श्रीवास यांनी मोबाईलमध्ये कैद केला. काही मिनिटांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून, हजारो नागरिकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी “माणुसकी अजून जिवंत आहे” अशा भावना व्यक्त केल्या आहेत, तर काहींनी वन विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
वन विभागाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह
उन्हाळ्याच्या दिवसांत वन्यप्राण्यांसाठी जंगल परिसरात कृत्रिम पाणवठे तयार करण्यात येतात, असा दावा वन विभागाकडून दरवर्षी केला जातो. मात्र, जंगलातील माकडांना पाण्यासाठी भररस्त्यात येऊन धावती बस अडवावी लागत असेल, तर हे पाणवठे प्रत्यक्षात कितपत कार्यरत आहेत, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
स्थानिकांच्या मते, खंडाळा घाट परिसरातील अनेक नैसर्गिक जलस्रोत आटले असून वन्यप्राण्यांना पाण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे वन्यजीव आणि वाहनचालक दोघांच्याही जीवितास धोका निर्माण होत आहे.
वाढत्या उष्णतेचा वन्यजीवांवर गंभीर परिणाम
विदर्भातील वाढत्या तापमानामुळे जंगलातील ओढे, नाले आणि पाणवठे कोरडे पडत आहेत. परिणामी माकडे, हरीण, रानडुक्कर यांसारखे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात रस्त्यांवर आणि गावांमध्ये येत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, ही परिस्थिती भविष्यात अधिक गंभीर होऊ शकते.
निसर्गप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी वन विभागाने तातडीने जंगल परिसरात पाण्याच्या टाक्या, कृत्रिम जलस्रोत आणि नियमित पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. खंडाळा घाटातील या घटनेने केवळ एका तहानलेल्या माकडाची व्यथा समोर आणलेली नाही, तर वाढत्या उष्णतेमुळे संकटात सापडलेल्या संपूर्ण वन्यजीवनाची वेदना अधोरेखित केली आहे.


