यवतमाळ : प्रतिनिधी
यवतमाळ : आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे क्षुल्लक कारणावरून पेटलेल्या वादाने एका कुटुंबाचा दुर्दैवी अंत घडवला. मटण नीट शिजले नसल्याच्या कारणावरून पतीने पाहुण्यासमोर पत्नीचा अपमान केल्याने व्यथित झालेल्या महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केली. चेतना मनोज जाधव (वय ३३) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जाधव याने आपल्या मित्राला जेवणासाठी घरी बोलावले होते. त्यासाठी पत्नीला मटणाची भाजी करण्यास सांगितले होते. मात्र जेवणादरम्यान मटण व्यवस्थित शिजले नसल्याचे कारण काढत त्याने पाहुण्यासमोरच पत्नीशी वाद घातला. हा वाद वाढत जाऊन अपमानास्पद स्वरूप धारण झाले. मनोजच्या संशयी स्वभावासोबतच दारूच्या व्यसनामुळे परिस्थिती अधिकच चिघळल्याचे सांगितले जाते.
या अपमानाने व्यथित झालेली चेतना भरल्या ताटावरून उठून घरात गेली आणि तिने विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर तिने ही बाब पतीला सांगितल्याने घरात एकच खळबळ उडाली. तिला तत्काळ आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान, चेतनाचे मामा मनोहर राठोड यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मनोज जाधव याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही २०१५ मध्ये त्याच्यावर कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल झाला होता. २०१७ मध्ये संसार सुरळीत चालविण्याच्या अटीवर चेतनाने त्याला माफ केले होते.
घटनेनंतर आर्णी ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली असून त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पल्लवी निनगूरकर करीत आहेत.


