मुंबई प्रतिनिधी
राज्य प्रशासनात पुन्हा एकदा मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला असून मंगळवारी रात्री उशिरा सहा वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या काही महिन्यांत प्रशासनात सातत्याने बदल्यांचा धडाका सुरू ठेवला असून, या नव्या आदेशामुळे मंत्रालयीन आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे शिस्तप्रिय आणि कठोर प्रशासक म्हणून ओळख असलेले IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची अवघ्या ४५ दिवसांत पुन्हा बदली करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, मंत्रालयातील वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव संजय खंदारे यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन विषयाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. हा कार्यभार त्यांनी धीरज कुमार यांच्याकडून स्वीकारायचा आहे.
दरम्यान, तुकाराम मुंढे यांची मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी या पदावर श्रीधर डुबे यांची जागा घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची महसूल व वन विभागांतर्गत आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. नियमानुसार अशा पदांवर किमान तीन वर्षांचा कार्यकाळ अपेक्षित असताना अवघ्या दीड महिन्यातच त्यांची बदली झाल्याने प्रशासनातील निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
प्रशासकीय सेवेत कठोर अंमलबजावणी, शिस्तप्रियता आणि राजकीय दबावाला न जुमानणारे अधिकारी अशी तुकाराम मुंढे यांची प्रतिमा आहे. गेल्या २१ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांची तब्बल २५ वेळा बदली झाली असून, पुन्हा एकदा झालेल्या बदलीमुळे सर्वसामान्यांमध्ये आणि प्रशासकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबाबत सकारात्मक भावना असून, त्यांच्या निर्णयक्षमतेमुळे अनेकदा प्रशासनातील निष्क्रियतेवर अंकुश बसल्याचे बोलले जाते.
याशिवाय, कान्हुराज बगाटे यांची महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी रुबल प्रखेर-अगरवाल यांच्याकडून कार्यभार स्वीकारायचा आहे. बाबासाहेब बेलदार यांची धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली असून, श्रीधर डुबे यांची मुंबई महानगर क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तसेच आर. एस. चव्हाण यांची हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेत व्यापक फेरबदल सुरूच ठेवले आहेत. विशेष म्हणजे अनेकदा कॅबिनेट बैठकीनंतरच बदल्यांचे आदेश जारी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच राज्य पोलीस दलात मोठा फेरबदल करत तब्बल ९६ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये अनेक IPS अधिकाऱ्यांचाही समावेश होता. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती आणि संभाजीनगर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे पोलीस प्रशासनातही मोठी खळबळ उडाली होती.
आता IAS अधिकाऱ्यांच्या नव्या बदल्यांमुळे राज्य प्रशासनात पुन्हा एकदा ‘बदली वारे’ वाहू लागल्याची चर्चा रंगली आहे. विशेषतः तुकाराम मुंढे यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे शासनाच्या प्रशासकीय धोरणावर विरोधकांकडूनही टीका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


