स्वप्नील गाडे,प्रतिनिधी
गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी आणि कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई पोलीस दलातर्फे राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत, वांद्रे येथील खेरवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार गणेश ठोंबरे यांना एप्रिल २०२६ महिन्यातील ‘उत्कृष्ट अंमलदार’ म्हणून गौरवण्यात आले आहे. एकाच महिन्यात खुनाच्या २ गुन्ह्यांसह खुनाचा प्रयत्न केलेल्या २ अशा एकूण ४ गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना जेरबंद करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
वांद्रे पूर्व येथील खेरवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या गंभीर गुन्ह्यांचा तपास करताना अंमलदार गणेश ठोंबरे (पो.ह.क्र. ०६०९७८) यांनी अत्यंत चिकाटीने आणि कौशल्याने तपासचक्र फिरवले. पोलीस दप्तरी नोंद असलेल्या दोन वेगवेगळ्या खुनाच्या प्रकरणांतील आरोपींचा माग काढत त्यांनी त्यांना अटक केली.
तसेच, जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केलेल्या अन्य दोन गुन्ह्यांतील संशयितांनाही तांत्रिक तपासाच्या आधारे बेड्या ठोकल्या. एका पाठोपाठ एक अशा ४ महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल करून गुन्हेगारांना गजाआड केल्याबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची ही विशेष निवड केली आहे. ठोंबरे यांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे खेरवाडी पोलीस स्टेशन आणि परिसरात त्यांचे मोठे कौतुक होत असून, अशा कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांमुळे सर्वसामान्यांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.


