मुंबई प्रतिनिधी
राज्यात उष्णतेचा कडाका दिवसेंदिवस वाढत असतानाच मान्सूनबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि अंदमान परिसरात तयार झालेल्या पोषक वातावरणामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीला वेग मिळण्याची चिन्हे आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत मान्सून अंदमान-निकोबार बेटांमध्ये दाखल होण्याची शक्यता असून, त्यानंतर २६ मेपर्यंत केरळ किनारपट्टी गाठण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाचे लक्ष आता मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे.
राज्यातील अनेक भागांत सध्या उष्णतेची तीव्र लाट अनुभवास येत आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तापमानाने अक्षरशः कहर केला असून जळगावमध्ये ४५ अंश सेल्सिअस तर अकोल्यात ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक यांसारख्या प्रमुख शहरांमध्येही उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून उष्माघाताच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, दक्षिण बंगालच्या उपसागरात ढगांची घनता वाढली असून समुद्रातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. अंदमान समुद्र आणि त्यालगतच्या परिसरात वाऱ्यांचा वेग वाढल्यामुळे मान्सूनच्या आगमनासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या मते, हे वातावरण पुढील काही दिवस कायम राहिल्यास मान्सून वेळेपूर्वीच सक्रिय होऊ शकतो.
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर साधारण सात ते आठ दिवसांत तो कोकण किनारपट्टीत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाची जोरदार सुरुवात होण्याचे संकेत मिळत आहेत. खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब मानली जात आहे.
गेल्या काही वर्षांतील मान्सूनच्या आगमनाच्या तारखा पाहिल्यास हवामान खात्याचे अंदाज आणि प्रत्यक्ष आगमन यात काही प्रमाणात फरक दिसून आला आहे. २०२० मध्ये ५ जूनचा अंदाज असताना मान्सून १ जूनलाच केरळमध्ये दाखल झाला होता. २०२१ मध्ये ३१ मेचा अंदाज वर्तवण्यात आला होता; मात्र प्रत्यक्ष आगमन ३ जून रोजी झाले. २०२२ मध्ये मान्सून २९ मे रोजी पोहोचला, तर २०२३ मध्ये तो तब्बल ८ जूनपर्यंत लांबला होता. २०२४ मध्ये ३० मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला, तर २०२५ मध्ये २४ मे रोजीच त्याने केरळ गाठून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
दरम्यान, राज्यात पुढील चार दिवस वातावरणात मोठे बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण किनारपट्टी, गोवा तसेच दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव आणि परिसरातील जिल्ह्यांना विशेष इशारा देण्यात आला असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा परिसरात समुद्रातील कमी दाबाचा पट्टा अधिक सक्रिय झाल्याने पुढील तीन ते चार दिवस हवामान ढगाळ राहणार असून वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे विदर्भ आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
मान्सूनच्या आगमनाच्या या हालचालींमुळे राज्यातील कृषी क्षेत्राला मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी आता पुढील काही दिवस निर्णायक ठरणार आहेत.


