पुणे प्रतिनिधी
राज्यात अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी एमएचटी-सीईटी परीक्षा आता मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभी आहे. राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाकडून (एनटीए) घेतल्या जाणाऱ्या जेईई मेन परीक्षेच्या धर्तीवर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) एमएचटी-सीईटीच्या पहिल्या सत्राची परीक्षा डिसेंबरमध्ये घेण्याचे नियोजन सुरू केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून ही नवी पद्धत लागू होण्याची शक्यता असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना बारावी, जेईई आणि सीईटी या सलग परीक्षांच्या ताणातून मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
सध्या राज्य मंडळाची बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतली जाते. त्याआधी जानेवारीमध्ये जेईई मेनचे पहिले सत्र पार पडते, तर एप्रिलमध्ये एमएचटी-सीईटीची परीक्षा होते. परिणामी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना अल्प कालावधीत तीन महत्त्वाच्या परीक्षा द्याव्या लागतात. या परीक्षांची तयारी, अभ्यासाचे नियोजन आणि मानसिक तणाव यामुळे अनेक विद्यार्थी व पालक चिंतेत असतात. हीच बाब लक्षात घेऊन सीईटी सेलने एमएचटी-सीईटीचे पहिले सत्र डिसेंबरमध्ये घेण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे.
सीईटी सेलच्या प्राथमिक नियोजनानुसार १५ डिसेंबर २०२६ ते १५ जानेवारी २०२७ या कालावधीत एमएचटी-सीईटीच्या पहिल्या सत्राची परीक्षा घेण्यात येऊ शकते. या निर्णयामागे केवळ वेळापत्रकातील बदल नसून संपूर्ण प्रवेश प्रक्रियेला अधिक गती देण्याचा व्यापक विचार असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रवेश परीक्षा वेळेत पूर्ण झाल्यास निकाल, केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया (CAP Round) आणि महाविद्यालयीन प्रवेशही वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
राज्य सरकारने यावर्षीपासून ‘पीसीएम’, ‘पीसीबी’ आणि ‘एमबीए’ अभ्यासक्रमांसाठी सीईटी परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्याचा निर्णय लागू केला आहे. या नव्या प्रयोगाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. एमबीए सीईटीच्या पहिल्या सत्रासाठी एक लाख १६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर दुसऱ्या सत्रासाठी ५३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्याचप्रमाणे पीसीबी गटाच्या पहिल्या सत्राला २ लाख ६४ हजार उमेदवार उपस्थित होते, तर दुसऱ्या सत्रात ९५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पीसीएम गटाच्या पहिल्या सत्रासाठी तब्बल ४ लाख ५४ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याची माहिती सीईटी सेलने दिली आहे. दुसरे सत्र अद्याप सुरू आहे.
शैक्षणिक तज्ज्ञांच्या मते, डिसेंबरमध्ये सीईटीचे पहिले सत्र घेतल्यास विद्यार्थ्यांना स्वतःच्या कामगिरीचे विश्लेषण करून पुढील सत्रासाठी तयारी सुधारण्याची संधी मिळेल. जेईई मेन, बारावी आणि सीईटी या तिन्ही परीक्षांचा अभ्यास अधिक संतुलित पद्धतीने करता येईल. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन अधिक परिणामकारकपणे करता येण्यास मदत होणार आहे.
दुसरीकडे, काही शिक्षकांनी या प्रस्तावाबाबत सावध भूमिका घेतली आहे. बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण होण्यापूर्वीच सीईटीचे सत्र घेतल्यास विद्यार्थ्यांवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ लागतो. त्यामुळे अभ्यासक्रम, कोचिंग क्लासेस आणि परीक्षांचे वेळापत्रक यामध्ये समन्वय साधणे हे सीईटी सेलसमोर मोठे आव्हान असणार आहे.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, “विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा आणि बारावीच्या परीक्षेची तयारी स्वतंत्रपणे व तणावमुक्त वातावरणात करता यावी, तसेच प्रवेश प्रक्रियेला विलंब होऊ नये, या उद्देशाने शैक्षणिक वर्ष २०२७-२८ मधील सीईटीचे नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार ‘पीसीएम’, ‘पीसीबी’ आणि ‘एमबीए’ अभ्यासक्रमांच्या सीईटीचे पहिले सत्र डिसेंबरमध्ये घेण्याचा विचार सुरू आहे.”
सीईटी सेलच्या या नव्या नियोजनामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळापत्रकात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. येत्या काही महिन्यांत यासंदर्भातील अंतिम आराखडा आणि अधिकृत वेळापत्रक जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


