पुणे प्रतिनिधी
पुण्यातील हडपसर परिसरात रुग्णालयाजवळ बॉम्बसदृश वस्तू ठेवल्याच्या खळबळजनक प्रकरणात महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई करत मुख्य आरोपीला नागपुरातून ताब्यात घेतले आहे. शिवाजी राठोड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो ट्रेन क्रमांक १८०२९ शालीमार एक्सप्रेसने पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. नागपूर रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) मदतीने आरोपीला अटक करण्यात आली.
या कारवाईमुळे पुण्यातील संवेदनशील बॉम्बप्रकरणाच्या तपासाला महत्त्वाचे यश मिळाले असून, आरोपीला लवकरच पुण्यात आणून पुढील चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. आरोपीने हडपसरमधील उषाकिरण रुग्णालय परिसरात बॉम्बसदृश वस्तू ठेवली होती. हा प्रकार नेमका दहशत निर्माण करण्यासाठी होता की त्यामागे अन्य काही हेतू होता, याचा तपास ATS आणि पुणे पोलीस करत आहेत.
सीसीटीव्ही फुटेजमुळे तपासाला दिशा
घटनेनंतर पुणे पोलिसांनी तातडीने विशेष तपास मोहीम हाती घेतली होती. रुग्णालयाच्या पार्किंग परिसरात संशयास्पद वस्तू ठेवणारी व्यक्ती कोण आणि तिचा उद्देश काय, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान एका व्यक्तीची हालचाल संशयास्पद आढळून आली. फुटेजमध्ये आरोपीचा चेहरा स्पष्टपणे दिसत असल्याने तपास यंत्रणांना त्याचा माग काढणे सोपे झाले.
तांत्रिक माहिती आणि प्राथमिक चौकशीतून आरोपी रेल्वेमार्गे शहराबाहेर पळून जात असल्याचा सुगावा लागला. त्यानुसार ATS आणि पुणे पोलिसांनी नागपूर RPFशी समन्वय साधत शालीमार एक्सप्रेसमध्ये शोधमोहीम राबवली. अखेर नागपुरात आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
बुधवारी संध्याकाळी उडाली होती खळबळ
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात बुधवारी संध्याकाळी झाली. हडपसरमधील कामधेनू सोसायटीच्या पार्किंग परिसरात एक संशयास्पद बॉम्बसदृश वस्तू आढळून आली होती. जवळच रुग्णालय असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाली.
घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (BDDS) घटनास्थळी पोहोचले. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी संपूर्ण परिसर तातडीने रिकामा करून सुरक्षा कवच उभारले. संशयास्पद वस्तूची बारकाईने तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर परिसरातील इतर ठिकाणीही कसून तपास मोहीम राबवण्यात आली.
सुरक्षा यंत्रणा सतर्क
या घटनेनंतर पुणे शहरातील संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणे, रुग्णालय परिसर, रेल्वे स्थानके आणि गर्दीच्या भागांमध्ये पोलिसांकडून विशेष तपासणी सुरू करण्यात आली आहे. आरोपीची चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही तपास ATSकडून केला जात आहे.


