मुंबई प्रतिनिधी
मुंबईकरांना ऐन उन्हाळ्यात लागू करण्यात आलेल्या 10 टक्के पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासन अधिक सतर्क झाले असून, पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी टाळण्यासाठी क्षेत्रनिहाय सूक्ष्म नियोजन करण्याचे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी जल अभियंत्यांना दिले आहेत. नागरिकांना कमीत-कमी असुविधा होईल, नियमित वेळेत आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरळीत राहील, यासाठी दुय्यम अभियंता आणि सहायक अभियंत्यांनी विशेष दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पावसाळ्यापूर्वी जलसाठ्यांवरील ताण आणि दुरुस्तीच्या कामांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात 15 मेपासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. या कपातीचा परिणाम काही भागांमध्ये अधिक तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन महानगरपालिका मुख्यालयात नुकतीच जल अभियंता विभागातील अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत बांगर यांनी विभागनिहाय आढावा घेत अभियंत्यांना कार्यक्षम नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.
पाणीकपातीच्या काळात कोणत्या परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ शकतो, कुठे टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, तसेच नागरिकांच्या तक्रारी वाढू शकतात अशा भागांचा स्वतंत्र अभ्यास करून कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रत्येक प्रभागात स्थानिक परिस्थितीनुसार स्वतंत्र नियोजन करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला आहे.
दरम्यान, जलवाहिन्यांवर किंवा थेट नळजोडण्यांवर अनधिकृतरीत्या विद्युत मोटारपंप लावून पाणी उपसा करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेशही बांगर यांनी दिले. अशा प्रकारांमुळे इतर नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याने दोषींवर दंडात्मक कारवाईबरोबरच फौजदारी गुन्हे दाखल करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. पाणीटंचाईच्या काळात अशा बेकायदेशीर प्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष पथके सक्रिय करण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
‘एम पूर्व’ आणि ‘एम पश्चिम’ विभागात आठवडाभर परिणाम
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेमार्फत अमर महाल (हेडगेवार उद्यान) ते तुर्भे निम्नस्तरीय जलाशय या दरम्यानचा जलबोगदा कार्यान्वित करण्याचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे सोमवार, 18 मे रोजी सकाळी 10 ते रात्री 10 या 12 तासांच्या कालावधीत ‘एम पूर्व’ आणि ‘एम पश्चिम’ विभागातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असून, अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे.
विशेषतः ‘एम पूर्व’ विभागातील प्रभाग क्रमांक 146, 147 आणि 148 तसेच ‘एम पश्चिम’ विभागातील प्रभाग क्रमांक 154 आणि 155 मधील नागरिकांना पुढील सात दिवस विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 18 मे ते 25 मे या कालावधीत या भागातील नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळून वापरावे, असे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महानगरपालिकेने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करताना, अत्यावश्यक कामांशिवाय पाण्याचा अपव्यय टाळण्याचेही सांगितले आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जलसाठ्यांवरील ताण कायम असताना प्रशासनाने घेतलेल्या या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी कितपत होते, याकडे आता मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.


