मुंबई प्रतिनिधी
देशभरातील वाढत्या उकाड्याने नागरिक त्रस्त झाले असताना भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेला मान्सूनबाबतचा अंदाज दिलासादायक ठरत आहे. यंदाचा नैऋत्य मान्सून वेळेआधीच केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता असून, २६ मे रोजी मान्सून केरळात पोहोचेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिक आणि प्रशासनामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सामान्यतः मान्सून १ जूनच्या सुमारास केरळात दाखल होतो. मात्र यंदा वातावरणीय परिस्थिती पोषक असल्याने मान्सून वेळेपूर्वीच सक्रिय होत असल्याचे संकेत मिळत आहेत. पुढील ४८ तासांत दक्षिण अंदमान समुद्र, बंगालचा उपसागर आणि अंदमान-निकोबार बेट परिसरात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण होणार असल्याचे IMD ने स्पष्ट केले आहे. १६ मेच्या आसपास मान्सून अंदमान परिसरात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दक्षिण आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्याच्या माहितीनुसार, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, माहे आणि दक्षिण कर्नाटक या भागांत पुढील चार ते पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये १३ ते १९ मेदरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
काही भागांत ताशी ५० ते १०० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात मोठे बदल होत असून त्याचा परिणाम देशातील विविध भागांत दिसून येणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
उष्णतेची लाट कायमच
एकीकडे मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागली असली तरी उत्तर-पश्चिम, पश्चिम आणि मध्य भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. राजस्थानमधील बारमेर येथे देशातील सर्वाधिक ४८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अनेक शहरांमध्ये तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले असून नागरिकांचे हाल होत आहेत.
कोकणात ६ जूनपर्यंत मान्सून
IMD च्या अंदाजानुसार, मान्सून ५ जूनपर्यंत गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ६ जूनपर्यंत कोकण किनारपट्टीवर मान्सून पोहोचू शकतो. पुण्यातही ७ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात कोणतेही मोठे चक्रीवादळ निर्माण झालेले नाही. त्यामुळे मान्सूनच्या प्रवासात मोठा अडथळा येण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान तज्ज्ञांनी नमूद केले आहे.
शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण
वेळेआधी मान्सून दाखल होण्याच्या शक्यतेमुळे राज्यातील शेतकरी वर्गामध्ये आशावादी वातावरण आहे. खरीप हंगामाच्या तयारीला वेग येणार असून पेरण्यांसाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून हवामान खात्याच्या या अंदाजामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


