मुंबई प्रतिनिधी
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे माजी खासदार आणि सरचिटणीस आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत अवघ्या सहा तासांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे, पक्षप्रवेशानंतर त्यांनी राष्ट्रवादी किंवा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्ट करत, “माझा DNA शिवसेनेचा आहे,” असे ठाम विधान केले.
मुंबईतील बाळासाहेब भवन येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भुसे, उदय सामंत आणि शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे उपस्थित होते. या प्रवेशामुळे ठाणे आणि मुंबई परिसरातील राजकीय समीकरणांवर चर्चा सुरू झाली आहे.
“एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवून परत आलो”
शिवसेनेत प्रवेश करताना आनंद परांजपे यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत भावनिक प्रतिक्रिया दिली.
“एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांचा वारसा पुढे नेला आहे. त्यांच्यावर आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून मी पुन्हा शिवसेनेत आलो. माझे वडील १९६६ पासून शिवसेनेत होते. नगरसेवक आणि खासदार म्हणून त्यांनी काम केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमुळेच मी संसदेत पोहोचलो,” असे परांजपे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “मला खासदारकीचं तिकीट मिळवून देण्यात एकनाथ शिंदे यांची मोठी भूमिका होती. त्यांनी माझ्या प्रचाराची धुरा सांभाळली. त्यामुळे हा पक्षप्रवेश केवळ राजकीय निर्णय नसून भावनिक नातं पुन्हा जुळल्यासारखं आहे.”
“पदासाठी नाही, संघटनेसाठी आलो”
राजकीय वर्तुळात त्यांच्या प्रवेशामागे नाराजी असल्याच्या चर्चा सुरू असताना परांजपे यांनी त्या फेटाळून लावल्या.
“मी पदाच्या लालसेपोटी शिवसेनेत आलो नाही. मला संघटनेत काम करायचं आहे. माझ्या आयुष्याची सुरुवात शिवसेनेतून झाली. त्यामुळे घरवापसी झाल्याची भावना आहे,” असे ते म्हणाले.
त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आपल्या सहकाऱ्यांचेही आभार मानले.
“२०१२ मध्ये माझा राष्ट्रवादीतील प्रवास सुरू झाला. त्या काळात पक्षाने मला खूप काही दिलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार आणि जितेंद्र आव्हाड यांचेही मी आभार मानतो,” असे म्हणत त्यांनी कोणतीही कटुता नसल्याचे दाखवून दिले.
“राष्ट्रवादीवर टीका करणार नाही”
राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर परांजपे नाराज होते का, असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र त्यांनी यावरही स्पष्ट भूमिका घेतली.
“मी मुळात नाराज नाही. राष्ट्रवादीत मला दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या मी प्रामाणिकपणे पार पाडल्या. आता मी शिवसेनेत आलो म्हणून राष्ट्रवादीवर टीका करणं माझ्या रक्तात नाही,” असे परांजपे म्हणाले.
“माझा चेहरा कायम हसमुख असतो. मी कुणाविरोधात कटुता ठेवत नाही,” असे म्हणत त्यांनी आपल्या शैलीतच चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
ठाणे-पट्यात शिवसेनेला बळ?
आनंद परांजपे हे ठाणे जिल्ह्यातील परिचित चेहरा मानले जातात. शिवसेनेच्या मूळ संघटनात्मक रचनेतून पुढे आलेल्या परांजपे यांच्या पुनरागमनामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ठाणे-मुंबई पट्ट्यात बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी आणि संघटनात्मक बदलांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर परांजपे यांचा राजीनामा आणि तत्काळ झालेला पक्षप्रवेश हा अजित पवार गटासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा धक्का मानला जात आहे.


