मुंबई प्रतिनिधी
मुंबईकरांसाठी चिंतेची बातमी समोर आली असून, मुंबई महानगरपालिकेने आज १५ दि. शुक्रवारपासून शहरात १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईला दररोज होणाऱ्या सुमारे ५२०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्यात आता तब्बल ५२० दशलक्ष लिटरची कपात होणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील उपलब्ध जलसाठा झपाट्याने घटून केवळ २२ टक्क्यांवर आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
महापालिकेच्या जलविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मान्सूनपूर्व काळात उपलब्ध पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करणे आवश्यक झाले आहे. पुढील काही आठवड्यांत पाण्याची परिस्थिती अधिक गंभीर होऊ नये, तसेच उपलब्ध साठा मान्सूनपर्यंत पुरवता यावा यासाठी ही कपात लागू करण्यात आली आहे.
दरम्यान, पाणी कपात लागू करण्यात आली असली तरी मुंबईतील पाणीपुरवठ्याच्या वेळांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नागरिकांना सध्या ज्या वेळेत पाणीपुरवठा केला जातो, त्याच वेळापत्रकानुसार पाणी मिळत राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच पाण्याचा दाब शक्य तितका कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही सांगण्यात आले.
विशेषतः शहरातील उंच भागांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ नये यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. वितरण व्यवस्थेमध्ये गळती, अनधिकृत वापर किंवा दाबातील तफावत यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अपर वैतरणा, विहार आणि तुळशी या धरणांमधील पाणीसाठा गेल्या काही आठवड्यांत सातत्याने घटत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याची मागणी वाढत असताना उपलब्ध साठा कमी होत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
दरम्यान, मुंबई महानगर प्रदेशातील इतर शहरांमध्ये अद्याप परिस्थिती तुलनेने नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. ठाणे महानगरपालिकेकडून सध्या कोणतीही अधिकृत पाणी कपात जाहीर करण्यात आलेली नाही. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातही पाणीपुरवठा नियमित सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. वसई-विरारमध्येही सध्या पाणीपुरवठा सुरळीत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
नवी मुंबई महानगरपालिकेकडून मात्र पुढील आठवड्यात धरणांतील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. मीरा-भाईंदर परिसरात काही दिवसांपूर्वी ३१ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता; मात्र सध्या परिस्थिती पूर्ववत झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. अनावश्यक पाण्याचा वापर टाळणे, घरगुती गळती तातडीने दुरुस्त करणे, वाहन धुणे किंवा इतर दुय्यम कारणांसाठी पाण्याचा अपव्यय टाळणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने नमूद केले. मान्सून वेळेत दाखल होईपर्यंत उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन राखणे हीच सध्याची गरज असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.


