रणजीत मस्के, प्रतिनिधी
लातूर : जिल्ह्यात अवैध गुटखा व तंबाखू विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने उदगीर येथे मोठी कारवाई करत ७ लाख ९३ हजार २०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि चारचाकी वाहन जप्त केले. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध धंदे, मादक पदार्थ, गुटखा व तंबाखू विक्रीविरोधात कठोर मोहीम सुरू आहे. अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ यांनी पथकाला गुप्त माहितीच्या आधारे कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार १३ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उदगीर तालुक्यातील डिग्रस पाटी परिसरात गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी स्वीफ्ट डिझायर कारमधून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी नेला जात आहे. माहिती खात्रीशीर असल्याने पोलिसांनी डिग्रस गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात सापळा रचला.
सकाळी सुमारे १०.४० वाजण्याच्या सुमारास एमएच-१२ केएन-३९६६ क्रमांकाची संशयित कार येताना दिसताच पोलिसांनी वाहन थांबवून चालकाची चौकशी केली. चालकाने आपले नाव ओमकार नरसन नरहारे (वय २१, रा. हैबतपूर ता. उदगीर, सध्या रा. आष्टामोड ता. चाकूर, जि. लातूर) असे सांगितले.
यानंतर वाहनाची सखोल तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विमल पान मसाला गुटखा व व्ही-१ सुगंधित तंबाखू आढळून आली. पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा, तंबाखू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी स्वीफ्ट डिझायर कार असा एकूण ७ लाख ९३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
प्राथमिक तपासात आरोपी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधित गुटखा व तंबाखूची वाहतूक आणि विक्री करत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम ५९ अन्वये उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, पोलीस हवालदार मनोज खोसे, पोलीस हवालदार अर्जुन राजपूत, पोलीस हवालदार रियाज सौदागर, पोलीस हवालदार साहेबराव हाके आणि पोलीस हवालदार आनंद हल्लाळे यांनी केली.


