अहिल्यानगर प्रतिनिधी
अहिल्यानगर शहरातील केडगाव परिसरात पार पडलेल्या एका साखरपुड्याच्या समारंभात घडलेल्या धक्कादायक चोरीच्या घटनेचा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत उलगडा केला आहे. विशेष म्हणजे, या चोरीमागे कोणताही सराईत गुन्हेगार नसून अवघ्या आठ वर्षांच्या मुलाचा सहभाग असल्याचे समोर आल्याने पोलिसांसह नागरिकांनाही मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात साडेसोळा तोळे सोनं आणि रोकड असा जवळपास २५ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. साखरपुड्यासारख्या आनंदाच्या कार्यक्रमात क्षणार्धात घडलेल्या या चोरीमुळे उपस्थित नातेवाईक आणि कुटुंबीय हादरले होते. मात्र, कोतवाली पोलिसांनी वेगवान तपास करत मध्य प्रदेशातील आंतरराज्य टोळीपर्यंत धागेदोरे पोहोचवले आणि संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला.
फोटो काढण्याच्या गडबडीत बॅग लंपास
मिळालेल्या माहितीनुसार, २ मे २०२६ रोजी केडगाव येथे आशितोष नंदकुमार मरकड यांचा साखरपुडा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी शेवगाव येथून आशितोष यांच्या आत्या सिंधू महेश माने या उपस्थित होत्या. नवदांपत्यासाठी खरेदी केलेले साडेसोळा तोळे सोनं त्यांनी एका बॅगेत ठेवले होते.
कार्यक्रमादरम्यान फोटो काढण्यासाठी सिंधू माने स्टेजवर गेल्या. त्याच क्षणी गर्दी आणि गोंधळाचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने सोन्याची बॅग लंपास केली. कार्यक्रम संपल्यानंतर बॅग गायब झाल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांमध्ये एकच गोंधळ उडाला.
दुसऱ्याच दिवशी सिंधू माने यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे फिरवली.
CCTV फुटेज पाहून पोलिसांनाही धक्का
घटनास्थळ आणि परिसरातील CCTV फुटेज तपासताना पोलिसांना अनपेक्षित चित्र दिसले. सोन्याची बॅग घेऊन जाणारी व्यक्ती ही कोणतीही प्रौढ व्यक्ती नसून अवघा आठ वर्षांचा मुलगा असल्याचे स्पष्ट झाले. हा मुलगा अत्यंत चतुराईने गर्दीत मिसळत बॅग घेऊन बाहेर पडताना दिसत होता.
फुटेजमध्ये मुलाची हालचाल आणि चोरी करण्याची पद्धत पाहून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. प्राथमिक तपासात हा मुलगा एका आंतरराज्य टोळीशी संबंधित असल्याची माहिती समोर आली.
मध्य प्रदेशात शोधमोहीम
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी कोतवाली पोलिसांनी विशेष पथक तयार केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे, हेड कॉन्स्टेबल विनोद बोरगे, विशाल दळवी आणि सूरज कदम यांचा समावेश असलेले पथक मध्य प्रदेशात रवाना करण्यात आले.
तपासादरम्यान मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात अशा प्रकारच्या चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याची माहिती मिळाली. विशेषतः पचोर तालुक्यातील सांसी भागातील टोळीने केडगाव येथील चोरी केल्याचा सुगावा पोलिसांना लागला.
यानंतर पोलिसांनी अत्यंत गोपनीय आणि नियोजनबद्ध पद्धतीने शोधमोहीम राबवत संबंधित टोळीचा माग काढला. अखेर आठ वर्षांच्या मुलासह टोळीतील सदस्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीस गेलेले सोनं आणि रोकड जप्त करण्यात आली.
बाहेरील पोलिसांवर हल्ल्यांचा इतिहास
राजगड जिल्ह्यातील काही भागांमध्ये इतर राज्यांतून तपासासाठी आलेल्या पोलिसांवर हल्ले आणि मारहाणीच्या घटना यापूर्वी घडल्याची माहिती आहे. त्यामुळे या कारवाईदरम्यान अहिल्यानगर पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, कोतवाली पोलिसांच्या पथकाने अत्यंत सावधगिरी आणि शिताफीने कारवाई करत टोळीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
कोतवाली पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक
साडेसोळा तोळे सोनं आणि रोकड असा जवळपास २५ लाख रुपयांचा मुद्देमाल सुरक्षितपणे हस्तगत करण्यात पोलिसांना यश आल्याने शहरात कोतवाली पोलिसांच्या कामगिरीचे मोठे कौतुक होत आहे. अल्पवयीन मुलांचा वापर करून चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळ्यांचा गंभीर मुद्दा या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला असून, अशा टोळ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.


