नवी दिल्ली वृत्तसंस्था
संपूर्ण देशासाठी जीवनदायी ठरणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) आगमनाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असून, अंदमान-निकोबार बेटांवर पुढील चार ते पाच दिवसांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान-निकोबार बेटांमध्ये मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने देशभरातील शेतकरी, नागरिक आणि हवामान तज्ज्ञांचे लक्ष आता या घडामोडीकडे लागले आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वातावरणात अनुकूल बदल वेगाने होत आहेत. या प्रणालीच्या प्रभावामुळे मॉन्सूनचा वेग वाढण्याची शक्यता असून, अंदमानात त्याचे वेळेआधी आगमन होण्याची चिन्हे दिसत आहेत.
केरळातील आगमनाकडे देशाचे लक्ष
मॉन्सूनच्या अंदमानातील आगमनानंतर केरळातील प्रवेशाची उलटगणती सुरू होते. सामान्यतः २१ मेच्या आसपास मॉन्सून पोर्टब्लेअरपर्यंत पोहोचतो, तर १ जूनला केरळमध्ये अधिकृतपणे दाखल होतो. यंदा मात्र हवामानातील घडामोडी पाहता मॉन्सून नेहमीपेक्षा लवकर सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गतवर्षी १३ मे रोजी मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्रात दाखल झाला होता. त्यानंतर केरळमध्ये तब्बल आठवडाभर आधी म्हणजे २४ मे रोजी मॉन्सूनचे आगमन झाले होते. विशेष म्हणजे, २५ मेपर्यंत मॉन्सून महाराष्ट्राच्या तळ कोकण किनारपट्टीपर्यंत पोहोचल्याने राज्यात पावसाची लवकर सुरुवात झाली होती. त्यामुळे यंदाही अशीच परिस्थिती निर्माण होते का, याकडे कृषी क्षेत्रासह सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
दरम्यान, बंगालच्या उपसागराच्या नैर्ऋत्य भागात मंगळवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत या प्रणालीची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तमिळनाडू, रायलसीमा, उत्तर कर्नाटक ते मराठवाड्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून, अनेक भागांत ढगाळ वातावरण आणि पूर्वमोसमी पावसाची शक्यता वाढली आहे.
या प्रणालीचा परिणाम म्हणून दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्लाही प्रशासनाने दिला आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक संकेत
मॉन्सूनच्या संभाव्य लवकर आगमनामुळे खरीप हंगामाच्या तयारीला वेग येणार आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या तीव्र असताना, मॉन्सूनच्या सकारात्मक संकेतांमुळे शेतकऱ्यांमध्ये आशावादाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पावसावर अवलंबून असलेल्या शेतीसाठी ही दिलासादायक बातमी मानली जात आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांतील समुद्रावरील वाऱ्यांची दिशा, तापमानातील बदल आणि कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता यावर मॉन्सूनच्या पुढील वाटचालीचे चित्र स्पष्ट होणार आहे.


