मुंबई प्रतिनिधी
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड घडली असून राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून समन्स बजावण्यात आले आहे. विशेष तपास पथकाकडून तब्बल सहा तास चौकशी झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच ही कारवाई झाल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आर्थिक गैरव्यवहार, संशयास्पद व्यवहारांची साखळी आणि कथित मनी लॉन्ड्रिंगच्या अनुषंगाने ही चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
भोंदू बाबा म्हणून चर्चेत आलेल्या अशोक खरात प्रकरणाचा तपास सध्या अनेक स्तरांवर सुरू असून विविध यंत्रणा आर्थिक व्यवहारांचा छडा लावत आहेत. विशेष तपास पथकाच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी ११ मे रोजी रुपाली चाकणकर यांची सलग सहा तास चौकशी केली होती. या चौकशीत अनेक आर्थिक व्यवहार, संबंधित व्यक्तींमधील संपर्क आणि मालमत्तांबाबत माहिती घेतल्याचे समजते. त्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालयानेही चौकशीची व्याप्ती वाढवत रुपाली चाकणकर यांना याच आठवड्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणात याआधीही रुपाली चाकणकर यांच्या बहिणीची चौकशी करण्यात आली होती. तपास यंत्रणांकडून आर्थिक देवाणघेवाण, जमीन व्यवहार आणि कथित गुंतवणूक यांची सखोल छाननी सुरू असून अनेक कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, दुसरीकडे अशोक खरात यांची पत्नी कल्पना खरात यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी उच्च न्यायालयाने तहकूब केली आहे. शिर्डी येथील जमीन फसवणूक प्रकरणात त्यांच्यावर फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारीचे गंभीर आरोप आहेत. राहाता येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.
शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, अशोक खरात आणि इतर आरोपींनी कर्ज व्यवहाराच्या नावाखाली सुमारे दहा कोटी रुपये किमतीची शेतजमीन फसवणुकीने स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात कल्पना खरात यांच्या वतीने अॅड. प्रशांत गिरी यांनी न्यायालयात बाजू मांडताना हा वाद दिवाणी स्वरूपाचा असल्याचा दावा केला. तसेच संबंधित प्रकरणात आधीच नोटिसा बजावण्यात आल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
पोलिसांकडून कल्पना खरात यांचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत असल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. त्याचवेळी अशोक खरात हे आधीपासूनच तुरुंगात असल्याचेही सांगण्यात आले. अशोक खरात यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे संपूर्ण कुटुंब सामाजिकदृष्ट्या बदनाम झाल्याचे सांगत तातडीने सुनावणी घेण्याची विनंती बचाव पक्षाने केली.
मात्र न्यायालयाच्या कामकाजावरील ताणामुळे या प्रकरणावर सविस्तर सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने हे प्रकरण न्यायालयीन सुट्टीदरम्यान पुन्हा मांडण्यास परवानगी दिली आहे. आता मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात, म्हणजे २५ ते ३० मे दरम्यान या प्रकरणाचा पुन्हा उल्लेख केला जाणार असून त्यावेळी अटकपूर्व जामीन अर्जावर पुढील सुनावणी होण्याची शक्यता आहे.
अशोक खरात प्रकरणात एका मागोमाग एक घडणाऱ्या कारवायांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून तपास यंत्रणांच्या पुढील हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


