रणजित मस्के,प्रतिनिधी
सांगली जिल्हयातील जत तालुक्यातील संख येथे घडलेल्या एका थरारक हत्याकांडाचा छडा लावण्यात उमदी पोलिसांना अवघ्या तीन तासांत यश आले आहे. घराच्या व्हरांड्यात झोपलेल्या संतोष शिवाप्पा बिरादार (वय ४२) यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत. महांतेश मल्लय्या स्वामी (वय ३५, रा. दरीबडची) आणि रोहित ऊर्फ नागेश बाळू जगदाळे (वय २२, रा. विश्रामबाग, सांगली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
या घटनेबाबत माहिती अशी की, १० मे रोजी रात्री साडेबारा ते एकच्या सुमारास संतोष बिरादार हे आपल्या कुटुंबासह घराच्या व्हरांड्यात झोपले होते. यावेळी आलेल्या आरोपींनी त्यांच्या छातीवर गावठी कट्ट्यातून दोन गोळ्या झाडून त्यांचा निर्घृण खून केला आणि अंधाराचा फायदा घेत शेताच्या दिशेने पलायन केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे व त्यांच्या पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली.
तपासादरम्यान सपोनि संदीप कांबळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक संशयित संख ते दरीबडची रोडवर दबा धरून बसला आहे. पोलिसांनी तात्काळ दोन पथके तयार करून त्या ठिकाणी धाड टाकली आणि रोहित जगदाळे याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने या गुन्ह्यात महांतेश स्वामी याचा सहभाग असल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करत जाडरबोबलाद ते माडग्याळ रस्त्यावरील एका शेतातून दुसऱ्या आरोपीलाही ताब्यात घेतले.
कोणताही ठोस पुरावा समोर नसताना केवळ गोपनीय माहिती आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर उमदी पोलिसांनी अवघ्या तीन तासांत या गुन्ह्याची उकल केली. या कारवाईत सपोनि संदीप कांबळे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक बंडू साळवे, दिनेश घसाडे, सिद्धेश्वर गायकवाड आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या जलद कामगिरीबद्दल पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत असून सपोनि संदीप कांबळे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.


