पुणे प्रतिनिधी
पुण्यातील कोथरूड परिसरात एका १८ वर्षीय विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. हुंड्यासाठी सतत छळ करण्यात आला आणि अखेर जेवणातून विष देऊन तिची हत्या करण्यात आली, असा गंभीर आरोप मृत तरुणीच्या माहेरच्यांनी केला आहे. श्रुती सुनील बनसोडे असे मृत तरुणीचे नाव असून, अवघ्या दोन वर्षांपूर्वी तिने प्रेमविवाह केला होता. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रुतीचा विवाह २८ मार्च २०२४ रोजी बुद्धभूषण गायकवाड या तरुणासोबत झाला होता. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते आणि त्यातूनच त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यावेळी श्रुती अल्पवयीन असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. सामाजिक बदनामी आणि मुलीच्या हट्टापोटी कुटुंबीयांनी या विवाहाला संमती दिल्याचे समोर आले आहे.
लग्नानंतर छळाला सुरुवात
विवाहानंतर काही महिन्यांतच श्रुतीला सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. हुंड्यासाठी वारंवार मागण्या केल्या जात होत्या. विरोध केल्यास मारहाण, शिवीगाळ आणि धमक्या दिल्या जात असल्याचेही सांगण्यात आले.
याचदरम्यान, श्रुतीचे काही खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात येत होती. त्यामुळे भीतीपोटी श्रुती आणि तिचे आई-वडील पोलिसांकडे जाण्यास धजावत नव्हते. “मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, समाजात बदनामी होईल या भीतीने आम्ही गप्प राहिलो,” अशी भावना नातेवाईकांनी व्यक्त केली.
अचानक प्रकृती बिघडली, उपचारादरम्यान मृत्यू
४ मे रोजी श्रुतीची प्रकृती अचानक बिघडली. तिला तीव्र उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने तातडीने पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच ५ मे रोजी तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट केले नसले तरी, जेवणातून विषबाधा झाल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
श्रुतीच्या आई-वडिलांनी पती, सासू-सासरे आणि दीर यांच्यावर थेट आरोप केले आहेत. “सर्वांनी मिळून आमच्या मुलीचा छळ केला. तिला मानसिकदृष्ट्या खचवलं आणि अखेर तिचा जीव घेतला,” असा आरोप त्यांनी केला.
पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी
या प्रकरणी संबंधितांविरोधात तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. कोथरूड पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून, पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू करण्यात आला आहे.
अल्पवयात झालेला विवाह, त्यानंतरचा कथित छळ आणि संशयास्पद मृत्यू या सगळ्या घटनांमुळे पुण्यात हळहळ व्यक्त होत आहे. एका तरुणीचे आयुष्य अशा प्रकारे संपल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


