पुणे प्रतिनिधी
राज्य मंडळाच्या दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांचे लक्ष अकरावी प्रवेश प्रक्रियेकडे लागले असून, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून प्रत्यक्षात सुरू होत आहे. शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करत विद्यार्थ्यांना अधिकृत पोर्टलवरून अर्जाचा भाग-१ आणि भाग-२ भरून नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. यंदाही प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार असून, नियमित तीन फेऱ्यांबरोबर ‘ओपन टू ऑल’ आणि मुलींसाठी विशेष फेरी अशी एकूण पाच टप्प्यांत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी रविवारी याबाबत माहिती दिली. प्रवेशासाठीची प्राथमिक नोंदणी प्रक्रिया एप्रिल महिन्यातच सुरू करण्यात आली होती. १० एप्रिलपासून विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग-१ भरता येत होता. आतापर्यंत तब्बल ७ लाख ७४ हजार ९१८ विद्यार्थ्यांनी प्राथमिक नोंदणी पूर्ण केल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. सोमवारपासून विद्यार्थ्यांना शैक्षणिक पात्रतेची माहिती भरून अंतिम नोंदणी करता येणार आहे.
यंदा प्रवेश प्रक्रियेत व्यवस्थापन, इन-हाऊस आणि अल्पसंख्याक कोट्यांसाठी स्वतंत्र ‘झिरो राउंड’ राबविण्यात येणार आहे. या फेरीत विद्यार्थ्यांना एकाच वेळी अर्जाचा भाग-२ भरून कनिष्ठ महाविद्यालयांची पसंतीक्रमाने निवड करता येणार आहे. विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांचे पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली आहे.
प्रवेश प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्यासाठी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्यावर विद्यार्थ्यांना हरकती आणि दुरुस्ती मागण्या नोंदविता येणार आहेत. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार संबंधित उपसंचालक कार्यालयांमार्फत ऑनलाइन तक्रार निवारण प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
दरम्यान, राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठीची स्पर्धा लक्षात घेता विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज भरावेत, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी आणि अधिकृत पोर्टलवरील सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतीही अडचण आल्यास विद्यार्थ्यांना हेल्पलाईन आणि ई-मेल सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
असा असेल ‘झिरो राउंड’चा तपशील
८ ते १० मे : विद्यार्थी नोंदणी आणि अर्जाचा भाग-१ भरण्याची प्रक्रिया
११ ते १३ मे : शैक्षणिक माहिती भरून अर्जाचा भाग-१ सादर करणे; भाग-२ अंतर्गत कोटा प्रवेशासाठी अर्ज भरण्याची सुविधा
१४ आणि १५ मे : तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध
१६ मे : हरकती आणि दुरुस्ती मागण्यांचे ऑनलाइन निवारण
१८ आणि १९ मे : अंतिम गुणवत्ता यादी जाहीर; व्यवस्थापन, इन-हाऊस आणि अल्पसंख्याक कोट्यांची झिरो राउंड प्रवेश प्रक्रिया
१९ मे : कोटा प्रवेशासाठी महाविद्यालयनिहाय यादी जाहीर; रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध
२० मे : पहिल्या नियमित प्रवेश फेरीसाठी रिक्त जागा जाहीर
विद्यार्थी आणि पालकांनी प्रवेश प्रक्रियेची अद्ययावत माहिती अधिकृत संकेतस्थळावरून तपासावी, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.


