पुणे प्रतिनिधी
पुणे : शहरातील हडपसर परिसरात एका नामांकित हॉस्पिटलसमोर बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आल्याने बुधवारी संध्याकाळी मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह बॉम्बशोधक व नाशक पथक (बीडीडीएस) आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या दृष्टीने परिसर तातडीने रिकामा करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक नागरिकांना हॉस्पिटलसमोर संशयास्पद वस्तू दिसून आली. त्यांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसर बंदोबस्तात घेतला. त्यानंतर बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले.
प्राथमिक पाहणीत सदर वस्तूवर दोन पाईप आणि टायमर असल्याचे आढळून आले. टायमरवर ‘७.२८’ अशी वेळ सेट करण्यात आल्याचे दिसून आले असून, सुमारे सहा तासांचा वेळ सेट केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
बॉम्बशोधक पथकाने खबरदारीचा उपाय म्हणून सदर वस्तू ताब्यात घेत मोकळ्या जागेत हलवली. त्यानंतर पुढील तपास आणि तांत्रिक पाहणी सुरू करण्यात आली आहे. ही वस्तू नेमकी काय होती, ती कोणी आणून ठेवली होती तसेच यामागे घातपाताचा कोणता कट होता का, याचा तपास पोलीस करत आहेत.


