मुंबई प्रतिनिधी
मुंबईकरांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल सेवेत दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र या गर्दीत मोठ्या प्रमाणावर विनातिकीट प्रवासही होत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेत तिकीट तपासणी कमी असल्याचा गैरफायदा घेत अनेक प्रवासी तिकीटाशिवाय प्रवास करत असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. ही बाब लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे प्रशासनाने आता रात्रीच्या वेळेतही विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
पश्चिम रेल्वेकडून सुरू करण्यात आलेल्या या विशेष मोहिमेला ‘बॅटमॅन’ असे नाव देण्यात आले असून, चर्चगेट ते विरार दरम्यान रात्री ९ वाजल्यापासून ते पहाटे ६ वाजेपर्यंत लोकलच्या डब्यांमध्ये तिकीट तपासणी पथके तैनात केली जाणार आहेत. त्यामुळे आता शेवटच्या लोकलपर्यंत प्रवाशांना तिकीट तपासणीला सामोरे जावे लागणार आहे.
सध्या रेल्वे स्थानकांवर आणि लोकलमध्ये रात्री ९ वाजेपर्यंतच तिकीट तपासणी केली जाते. त्यानंतर तपासणी कमी होत असल्याने अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. विशेषतः उशिराच्या लोकलमध्ये आणि एसी लोकल सेवेत विनातिकीट प्रवासाचे प्रमाण वाढल्याचे रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आले आहे. यामुळे महसुलाचे नुकसान होत असून, नियमित तिकीट काढणाऱ्या प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत होती.
याच पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने ‘बॅटमॅन’ मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत विशेष टीटीई पथके रात्रीच्या लोकलमध्ये फिरून अचानक तपासणी करणार आहेत. काही पथके थेट डब्यांमध्ये चढून प्रवाशांची तिकिटे तपासतील, तर काही स्थानकांवर सापळा लावून कारवाई करतील. त्यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.
पश्चिम रेल्वेने एप्रिल महिन्यातच ३ लाख ६० हजारांहून अधिक विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली आहे. त्यातून कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मात्र तरीही रात्रीच्या वेळेत विनातिकीट प्रवासाचे प्रमाण कमी होत नसल्याने प्रशासनाने आता २४ तास तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
“रात्रीच्या वेळेत विनातिकीट प्रवासाचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः एसी लोकलमध्ये काही प्रवासी निर्भयपणे तिकीटाशिवाय प्रवास करत आहेत. हे रोखण्यासाठी शेवटच्या लोकलपर्यंत विशेष तपासणी मोहीम सुरू ठेवली जाणार आहे,” अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे नियमित प्रवाशांना दिलासा मिळणार असला, तरी विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत. रात्रीच्या लोकलमध्ये आता ‘टीसी कधीही समोर येऊ शकतो’, अशी परिस्थिती निर्माण होणार असल्याने विनातिकीट प्रवासाला काही प्रमाणात आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


