मुंबई प्रतिनिधी
राज्यातील विविध भागांत एप्रिल-मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम धरणसाठ्यावर दिसून येत असून, यंदा १० मेअखेर राज्यातील धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत ४.७२ टक्के अधिक पाणी उपलब्ध आहे. राज्यातील मोठे, मध्यम आणि लघू प्रकल्पांमध्ये सध्या एकूण ३५.८६ टक्के जलसाठा असून, गेल्या वर्षी याच दिवशी तो ३१.१४ टक्के होता. त्यामुळे आगामी काही महिन्यांतील पाणीपुरवठा सुरळीत राहणार का, की उन्हाळ्याच्या अखेरीस पुन्हा जलसंकटाचे सावट गडद होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील धरणांमध्ये सध्या उपयुक्त १४ हजार ६४९.६४ दशलक्ष घनमीटर (द.ल.घ.मी.) जलसाठा उपलब्ध आहे. एकूण जलसाठा २२ हजार ३०८.८३ द.ल.घ.मी. इतका आहे. राज्यातील सर्व धरणांची एकत्रित पाणीसाठा क्षमता ४८ हजार ५८२.६ द.ल.घ.मी. इतकी आहे. त्यात मृतसाठा ७ हजार ७४२.०७ द.ल.घ.मी., तर उपयुक्त साठा ४० हजार ७४७.९ द.ल.घ.मी. आहे.
मोठ्या प्रकल्पांमध्ये ३५.३० टक्के पाणीसाठा
राज्यातील १३८ मोठ्या प्रकल्पांची एकूण क्षमता ३५ हजार ५३२.०५ द.ल.घ.मी. आहे. या प्रकल्पांमध्ये सध्या १६ हजार ५७७.३५ द.ल.घ.मी. पाणीसाठा असून, तो एकूण क्षमतेच्या ३५.३० टक्के आहे. गतवर्षी याच दिवशी मोठ्या धरणांमध्ये २९.८८ टक्के जलसाठा होता. त्यामुळे यंदा तुलनेने दिलासादायक स्थिती असल्याचे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मध्यम प्रकल्पांत ४१.१५ टक्के पाणी
राज्यातील २६४ मध्यम प्रकल्पांची एकूण क्षमता ६ हजार ३५६.२२ द.ल.घ.मी. असून, त्यामध्ये सध्या ३ हजार १.७६ द.ल.घ.मी. जलसाठा उपलब्ध आहे. या प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची टक्केवारी ४१.१५ इतकी असून, गेल्या वर्षी ती ३७.३१ टक्के होती.
लघू प्रकल्पांमध्येही सुधारणा
राज्यात सर्वाधिक २ हजार ६२६ लघू प्रकल्प आहेत. त्यांची एकूण क्षमता ६ हजार ६९४.३४ द.ल.घ.मी. आहे. या प्रकल्पांमध्ये सध्या २ हजार ७२९.७२ द.ल.घ.मी. जलसाठा असून, तो ३३.६४ टक्के आहे. गतवर्षी लघू प्रकल्पांमध्ये ३१.४१ टक्के जलसाठा होता.
अमरावती विभाग आघाडीवर, पुणे विभाग तळाशी
विभागनिहाय जलसाठ्याचा विचार केला असता अमरावती विभागात सर्वाधिक ४५.३५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. नागपूर विभागात ४२.२८ टक्के, तर छत्रपती संभाजीनगर विभागात ४०.६८ टक्के पाणी उपलब्ध आहे. कोकण विभागात ३९.२७ टक्के, नाशिक विभागात ३७.६१ टक्के जलसाठा आहे. पुणे विभागात मात्र सर्वात कमी २७.६३ टक्के पाणी शिल्लक आहे.
गतवर्षीच्या तुलनेत सर्वच विभागांमध्ये जलसाठ्यात वाढ झाली असली, तरी पुणे विभागातील तुलनेने कमी साठा चिंतेचा विषय मानला जात आहे.
जलसाठा समाधानकारक; तरी कपातीचे संकट कायम
राज्यातील अनेक शहरांमध्ये सध्या पाणीपुरवठ्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. काही ठिकाणी एक दिवसाआड, तर काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा असताना नागरिकांना पाणीटंचाईचा सामना का करावा लागतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जलतज्ज्ञांच्या मते, पाणीसाठा हा एकमेव निकष नसून जलवाहिन्यांची गळती, जुनाट वितरण व्यवस्था, विजेचा अपुरा पुरवठा, पंपिंग यंत्रणांतील बिघाड आणि वाढती लोकसंख्या यांमुळे पाणीपुरवठा व्यवस्थेवर ताण येतो. अनेक शहरांमध्ये जलवाहिन्या फुटून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत असल्याने उपलब्ध जलसाठ्याचा लाभ नागरिकांपर्यंत पूर्ण क्षमतेने पोहोचत नाही.
पावसाकडेच अंतिम नजर
सध्या जलसाठा गतवर्षीपेक्षा अधिक असला, तरी खरी परिस्थिती आगामी मान्सूनवर अवलंबून राहणार आहे. जूनपूर्व काळात तापमानात वाढ झाल्यास बाष्पीभवनामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थापन, गळती रोखणे आणि काटकसरीने वापर यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.


