रणजित मस्के, प्रतिनिधी
गडचिरोली तालुक्यातील मेंढा येथे एका महिलेची निर्घृण हत्या करून फरार झालेल्या आरोपींना शोधण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत मुख्य सूत्रधारासह तिघांना ताब्यात घेतले. जुन्या वादातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ मे रोजी सायंकाळच्या सुमारास मेंढा येथील अक्षय भानारकर यांच्या घरात शामकला सुखदेव किरंगे (रा. हिडदा, ता. कुरखेडा) या महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून गडचिरोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अज्ञात आरोपींचे कोणतेही ठोस धागेदोरे नसताना त्यांना पकडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी तातडीने या प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि गडचिरोली पोलीस ठाण्याचे संयुक्त पथक तयार केले. या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयित सुदामा रामभाऊ चौधरी याचा माग काढला आणि त्याला चंद्रपूर येथून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने पूर्व वैमनस्यातून शामकला यांचा खून केल्याची कबुली दिली.
याप्रकरणी पोलिसांनी सुदामा रामभाऊ चौधरी (३३, रा. शिरसगाव, जि. अहिल्यानगर) आणि त्याला मदत करणारा चेतन धर्माराव खोब्रागडे (रा. इंदिरानगर, गडचिरोली) यांना अटक केली आहे. तसेच या गुन्ह्यात सहभागी असलेल्या एका विधीसंघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल तराळे करत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, विनोद चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक भगतसिंग दुलत, उपनिरीक्षक शिवाजी देशमुख, माधुरी मिसाळ, भावना राऊत व त्यांच्या पथकाने फत्ते केली. अवघ्या काही तासांत खुनाचा छडा लावल्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे.

