मुंबई प्रतिनिधी
राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शिस्तीबाबत नागरिकांमध्ये लहान वयातच जागृती निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने मोठा आणि महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. राज्यभरात तब्बल ६० अत्याधुनिक ‘ट्रॅफिक गार्डन्स’ उभारण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने तयार केला असून, या उपक्रमाला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक ट्रॅफिक गार्डन उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून, प्रत्येक उद्यान सुमारे एक एकर क्षेत्रावर विकसित केले जाणार आहे. एका गार्डनसाठी अंदाजे एक कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पामुळे वाहतूक नियमांचे शिक्षण केवळ पुस्तकापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून वाहतूक शिक्षण
या ट्रॅफिक गार्डन्समध्ये लहान आकारातील रस्ते, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक सिग्नल, दिशादर्शक फलक, वळण रस्ते तसेच विविध वाहनांच्या प्रतिकृती उभारल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना या माध्यमातून वाहतुकीचे नियम, सुरक्षित वाहनचालकाची जबाबदारी आणि रस्ते सुरक्षेचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून समजावून सांगितले जाणार आहे.
वाहतूक नियमांचे पालन करण्याची सवय बालपणापासून लागल्यास भविष्यात अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास परिवहन विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या गार्डन्समध्ये शाळकरी मुलांसाठी विशेष प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जाणार असून प्रशिक्षित मार्गदर्शकांकडून विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे दिले जातील.
‘ट्रायल ट्रॅक’ची सुविधा; परवाना प्रशिक्षणालाही चालना
या ट्रॅफिक गार्डन्समध्ये वाहन परवाना मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षणाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र ‘ट्रायल ट्रॅक’ विकसित केला जाणार असून नवोदित वाहनचालकांना सुरक्षित वातावरणात सराव करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे वाहन चालवण्यापूर्वी आवश्यक शिस्त आणि नियमांची जाण निर्माण होण्यास मदत होणार आहे.
गर्दी टाळण्यासाठी शाळांना वेळेनुसार प्रवेश दिला जाणार असून संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नाममात्र शुल्क आकारले जाणार असल्याची माहितीही मंत्री सरनाईक यांनी दिली.
वाहतुकीबरोबरच पर्यावरण शिक्षणालाही प्राधान्य
या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ट्रॅफिक गार्डन्समध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली जाणार आहे. देशातील दुर्मिळ आणि पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या वृक्षांच्या प्रजाती निवडून त्यांची लागवड केली जाईल. प्रत्येक वृक्षाजवळ त्याचे पर्यावरणीय महत्त्व आणि वैशिष्ट्यांची माहिती देणारे फलक लावण्यात येणार आहेत.
त्यामुळे नागरिकांना वाहतूक नियमांसोबतच पर्यावरण संवर्धनाचे धडेही मिळणार आहेत. वाढते प्रदूषण आणि बदलती जीवनशैली लक्षात घेता पर्यावरण जनजागृतीसाठी हा उपक्रम प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
ई-वाहनांची माहितीही मिळणार
भविष्यातील तंत्रज्ञान लक्षात घेऊन या उद्यानांमध्ये ई-वाहनांच्या प्रतिकृती आणि त्याविषयी सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांचे फायदे, चार्जिंग प्रणाली, पर्यावरणपूरक वाहतूक याबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी विशेष विभाग तयार केला जाणार आहे.
परिणामी, ही ट्रॅफिक गार्डन्स केवळ वाहतूक शिक्षणापुरती मर्यादित न राहता ज्ञान, जनजागृती आणि विरंगुळ्याचे केंद्र म्हणून विकसित होणार असल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.
सुरक्षित महाराष्ट्राच्या दिशेने मोठे पाऊल
राज्य सरकारच्या या अभिनव उपक्रमामुळे लहान वयातच वाहतूक शिस्तीचे संस्कार रुजण्यास मदत होणार असून भविष्यात जबाबदार आणि सजग वाहनचालक घडवण्यास हातभार लागणार आहे. वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी जनजागृती हाच सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे सांगत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वाहतुकीकडे महाराष्ट्र आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत असल्याची भावना मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.


