• राज्याचा दहावीचा निकाल ९२.०९ टक्के
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालात यंदाही कोकण विभागाने अव्वल स्थान कायम राखले आहे. कोकण विभागाचा निकाल तब्बल ९७.६२ टक्के लागला असून राज्यातील सर्वाधिक निकालाची नोंद झाली आहे. तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८८.४१ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही यंदा जवळपास दोन टक्क्यांची घसरण झाली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत निकालाची माहिती जाहीर केली. राज्यभरातील नऊ विभागीय मंडळांतून यंदा नियमित विद्यार्थ्यांसह एकूण १५ लाख ५५ हजार ०२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ४२ हजार ४७२ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. यामधून १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला आहे.
विभागनिहाय निकालात कोकण अव्वल
राज्यातील विभागनिहाय निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा आघाडी घेतली. कोल्हापूर, मुंबई आणि पुणे विभागांनीही उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र मराठवाड्यातील दोन्ही विभागांचा निकाल तुलनेने कमी राहिला.
विभागनिहाय निकालाची टक्केवारी :
कोकण – ९७.६२ टक्के
कोल्हापूर – ९५.४७ टक्के
मुंबई – ९४.९७ टक्के
पुणे – ९४.२४ टक्के
अमरावती – ९०.५० टक्के
नाशिक – ९०.५३ टक्के
नागपूर – ८९.०७ टक्के
लातूर – ८८.४२ टक्के
छत्रपती संभाजीनगर – ८८.४१ टक्के
मुलींची पुन्हा सरशी
यंदाच्या निकालात मुलींनी पुन्हा एकदा मुलांपेक्षा सरस कामगिरी केली आहे. नियमित विद्यार्थ्यांमध्ये मुलींचा उत्तीर्णतेचा टक्का ९४.९६ इतका नोंदवला गेला असून मुलांचा निकाल ८९.५६ टक्के लागला आहे. म्हणजेच मुलींचा निकाल मुलांपेक्षा तब्बल ५.४० टक्क्यांनी अधिक आहे.
खाजगी आणि पुनर्परीक्षार्थींचा निकाल
राज्यातील नऊ विभागीय मंडळांतून २९ हजार ५०६ खाजगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८ हजार ८२५ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि २२ हजार ००३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. खाजगी विद्यार्थ्यांचा निकाल ७६.३३ टक्के इतका राहिला.
तर पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची स्थिती तुलनेने चिंताजनक राहिली. २९ हजार ५१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८ हजार ८६७ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि केवळ ९ हजार ७५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षार्थींचा निकाल ३३.७९ टक्के इतका नोंदवण्यात आला.
दिव्यांग विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
दिव्यांग विद्यार्थ्यांनीही यंदा उल्लेखनीय यश मिळवले आहे. राज्यभरातून १० हजार ०३१ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९ हजार ९१२ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले आणि ९ हजार ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९१.२२ टक्के इतका लागला.
२० विषयांचा शंभर टक्के निकाल
फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत एकूण ६४ विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. त्यापैकी तब्बल २० विषयांचा निकाल १०० टक्के लागल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली.
निकालात घटीची कारणे काय?
शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते, यंदा मूल्यमापनातील काटेकोरपणा, अभ्यासक्रमातील बदल आणि विद्यार्थ्यांवरील स्पर्धात्मक ताण यांचा निकालावर परिणाम झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कामगिरीत काही प्रमाणात घट झाल्याचे चित्रही विभागनिहाय आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
दरम्यान, राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष आता अकरावी प्रवेश प्रक्रियेकडे लागले असून पुढील काही दिवसांत प्रवेश प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे.


