मुंबई प्रतिनिधी
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील रिक्त जागांसाठी अखेर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली. अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपरिषदेची संपूर्ण निवडणूक, काही ठिकाणी स्थगित झालेल्या प्रभागांची निवडणूक तसेच विविध नगरपरिषद आणि नगरपंचायतींतील रिक्त जागांसाठी पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यामुळे स्थानिक राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत.
राज्यातील १४ जिल्ह्यांतील ८ नगरपरिषदा आणि १४ नगरपंचायतींमधील एकूण ४७ रिक्त जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २० जून रोजी मतदान होणार असून, २१ जून रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
पातूर नगरपरिषदेची संपूर्ण निवडणूक
अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपरिषदेत अध्यक्षपदासह २० सदस्य पदांसाठी संपूर्ण निवडणूक होणार आहे. या नगरपरिषदेतील प्रशासकीय कारभार आणि राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले आहे. स्थानिक पातळीवर विविध पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, इच्छुक उमेदवारांकडून तयारीला वेग आला आहे.
स्थगित प्रभागांतील मतदानही होणार
यापूर्वी उमेदवारांच्या निधनामुळे काही प्रभागांतील निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. आता त्या प्रभागांमध्येही मतदान होणार आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील मनमाड, धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर, बीड जिल्ह्यातील गेवराई आणि अकोला जिल्ह्यातील अकोट येथील प्रत्येकी एका प्रभागाचा समावेश आहे.
१८ नगरपरिषद-नगरपंचायतींमध्ये पोटनिवडणुका
राज्यातील विविध ठिकाणी सदस्यांनी दिलेले राजीनामे, निधन किंवा इतर कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणुका घेतल्या जाणार आहेत. ११ जिल्ह्यांतील १४ नगरपंचायतींमध्ये १५ जागांसाठी, तर ३ नगरपरिषदांमध्ये ३ जागांसाठी मतदान होईल. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय समीकरणांवर या निवडणुकांचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
असा असेल निवडणूक कार्यक्रम
निवडणूक कार्यक्रम जाहीर : १२ मे २०२६
उमेदवारी अर्ज दाखल : १८ मे ते २५ मे (सकाळी ११ ते दुपारी ३)
अर्जांची छाननी : २६ मे (सकाळी ११ वाजल्यापासून)
अर्ज मागे घेण्याची मुदत : २७ मे ते २ जून
मतदान : २० जून (सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०)
मतमोजणी व निकाल : २१ जून
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुकांना महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक ठिकाणी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असून, स्थानिक पातळीवरील पक्षीय ताकद आजमावण्याची संधी म्हणूनही या निवडणुकांकडे पाहिले जात आहे.


