जळगाव प्रतिनिधी
कौटुंबिक वाद आणि पतीच्या दारूच्या व्यसनामुळे होणाऱ्या सततच्या त्रासातून पत्नीनेच पतीचा गळा आवळून हत्या केल्याची घटना जळगाव शहरातील कानळादा रोड परिसरात उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक केली असून घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
भरत नामदेव पाटील (वय ५०) असे मृताचे नाव असून मनीषा भरत पाटील (वय ४५) असे अटक करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. जळगाव शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत पाटील यांना दारूचे व्यसन होते. या कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असत. दारू पिऊन घरी आल्यानंतर भरत पाटील पत्नीला मानसिक त्रास देत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून घरातील तणाव वाढला होता.
घटनेच्या रात्री दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. हा वाद तीव्र झाल्यानंतर मनीषा पाटील यांनी पतीचा गळा आवळल्याचा आरोप आहे. त्यात भरत पाटील यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.
शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्याने श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी मनीषा पाटील यांना ताब्यात घेत अटक केली. प्राथमिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रकरणाचा पुढील तपास जळगाव शहर पोलिस करत आहेत.


