वसई प्रतिनिधी
महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करणारी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. विविध गुन्ह्यांच्या तपासातून जप्त करण्यात आलेला तब्बल ७ कोटी ८६ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीस आयुक्तांच्या हस्ते शुक्रवारी संबंधित तक्रारदारांना सन्मानपूर्वक परत करण्यात आला.
आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये गेल्या काही काळात चोरी, जबरी चोरी, घरफोडी, मोबाईल चोरी तसेच सायबर फसवणुकीचे गुन्हे नोंदविण्यात आले होते. या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी प्रभावी कामगिरी करत चोरीस गेलेला व फसवणुकीत गमावलेला मुद्देमाल शोधून काढला. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा मुद्देमाल मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आला.
परत करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये विविध प्रकारची वाहने, मोबाईल फोन, सोन्या-चांदीचे दागिने तसेच सायबर गुन्ह्यांमधून फसवणूक झालेली रोख रक्कम यांचा समावेश आहे. एकूण ७.८७ कोटी रुपयांच्या या मालमत्तेच्या परताव्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत.
हरवलेल्या अथवा चोरीला गेलेल्या वस्तू पुन्हा मिळाल्याने अनेक तक्रारदारांनी आनंद व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले. अशा प्रकारच्या कारवाईमुळे गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यास मदत होत असून नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना बळकट होत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
या कार्यक्रमास पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, सर्व पोलीस उपआयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पत्रकार तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


