मुंबई प्रतिनिधी
मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा कणा अधिक मजबूत करत खोपोली–कुसगाव दरम्यान उभारण्यात आलेल्या १३.३ किमी लांबीच्या नव्या मार्गिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मोठ्या उत्साहात पार पडले. ‘मिसिंग लिंक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रकल्पाला ‘कनेक्टिंग लिंक’ असे संबोधावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
लोकार्पणासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि वाहनचालकांची उपस्थिती असल्याने महामार्गावर काही काळ अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. परिणामी कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरू झाला; मात्र या ऐतिहासिक प्रकल्पामुळे पुढील काळात प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
प्रवासात ३० मिनिटांची बचत, अंतरात ६ किमी घट
एमएसआरडीसीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या नव्या मार्गिकेमुळे मुंबई–पुणे प्रवासाचा कालावधी सुमारे २५ ते ३० मिनिटांनी कमी होणार आहे. तसेच दोन्ही शहरांमधील अंतर सुमारे ६ किमीने घटणार असून इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होईल. दररोज कोट्यवधी रुपयांचे इंधन वाचण्याबरोबरच प्रवाशांचा वेळही वाचणार असल्याचे सांगण्यात आले.
१८२ मीटर उंच केबलस्टेड पूल; अभियांत्रिकीचा जागतिक विक्रम
या प्रकल्पातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे १८२ मीटर उंचीचा केबलस्टेड पूल. नदीवर उभारलेला हा पूल जगातील सर्वात उंच केबलस्टेड पुलांपैकी एक मानला जात असून तो अभियांत्रिकी कौशल्याचा उत्कृष्ट नमुना ठरला आहे.
ताशी २४० किमी वेगाच्या वाऱ्यालाही तोंड देण्याची क्षमता या पुलात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. निसर्ग चक्रीवादळाच्या वेगापेक्षा दुप्पट वेगाने वारा वाहिला तरीही हा पूल सुरक्षित राहील, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
सात देशांचा सहभाग; जागतिक दर्जाचे नियोजन
या प्रकल्पासाठी भारतासह सात देशांचे तंत्रज्ञान आणि कौशल्य वापरण्यात आले. कॅनडामध्ये डिझाइन, डेन्मार्कमध्ये विंड टेस्ट, व्हिएन्ना विद्यापीठात केबल चाचणी, मलेशियामध्ये केबल उत्पादन, तर तैवान, ऑस्ट्रिया आणि सिंगापूरच्या तज्ज्ञांचा सल्ला अशा विविध स्तरांवर हा प्रकल्प साकारला गेला.
‘अशक्य’ ते शक्य; आधीच्या सरकारवर टीका
या मार्गाची कल्पना २०१० मध्ये मांडण्यात आली होती; मात्र तो अशक्य असल्याचे सांगत १३ कारणे देण्यात आली होती, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर २०१५ मध्ये निर्णय बदलून हा प्रकल्प हाती घेतला आणि यशस्वीरीत्या पूर्ण केला, असे त्यांनी स्पष्ट केले.
बोगदे, रुंदी आणि अभियांत्रिकी आव्हान
या प्रकल्पांतर्गत दोन भव्य बोगदे उभारण्यात आले आहेत.
१.७५ किमी लांबीचा बोगदा
८.९२ किमी लांबीचा आशियातील सर्वांत रुंद बोगदा
२१.४२ मीटर रुंदीचा हा बोगदा देशातील सर्वाधिक रुंदीचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे लोणावळा तलावाच्या तळाखालून ५०० ते ६०० फूट खोलवरून हा बोगदा जातो, ही या प्रकल्पाची वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे.
इतिहासाचा संदर्भ; उंबरखिंडीची आठवण
या प्रकल्पाच्या ठिकाणाशी इतिहासही जोडलेला आहे. १६६१ साली छत्रपती शिवाजी महाराज यांनी कारतलब खानाविरुद्ध उंबरखिंडीत लढाई लढली होती, याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली. स्वराज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या या लढाईचे ऐतिहासिक महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
सहा ते आठ पदरी महामार्ग
खोपोली-कुसगाव दरम्यानचा मार्ग आता सहा ऐवजी आठ पदरी करण्यात आला आहे. यामुळे भविष्यातील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी होणार असून प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होईल.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या इतिहासात हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असून ‘कनेक्टिंग लिंक’मुळे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांना नवे बळ मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.


